बागलाणमध्ये ऊस गट शेतीचा प्रयोग यशस्वी

बागलाणच्या उत्तरेला धुळे जिल्ह्य़ाच्या सीमेवरील  पिंपळनेर येथील फड बागायती क्षेत्रात १०० शेतकऱ्यांच्या १५० एकरात सामूहिक गट शेतीत लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.

१०० शेतकऱ्यांची दीडशे एकर क्षेत्रावर लागवड, एकरी ७० टन उत्पादन

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : बागलाणच्या उत्तरेला धुळे जिल्ह्य़ाच्या सीमेवरील  पिंपळनेर येथील फड बागायती क्षेत्रात १०० शेतकऱ्यांच्या १५० एकरात सामूहिक गट शेतीत लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. बागलाणच्या सीमेलगत असलेल्या पिंपळनेर (ता. साक्री) येथील बागायती क्षेत्रात द्वारकाधीश साखर कारखान्याच्या सहयोगाने येथील ऊस उत्पादकांनी सामूहिक गट शेतीचा प्रयोग सुरू केला. ऊस विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रयोग राबविण्यात आला आहे.

कारखाना ऊस विकास कार्यक्रमासाठी बागलाण, साक्री, नवापूर आणि कळवण तालुक्यांमध्ये गेल्या २१ वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने ऊस विकासाच्या योजना राबवीत आहे. प्रमाणित ऊस बेण्यापासून पीक संगोपनासाठी संपूर्ण मालरूप खर्च विनाव्याजी राबवीत आहे. त्यासाठी नामांकित संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाने ऊस एकरी ३० ते ३५ मेट्रिक टनावरून ६० ते ८० पर्यंत तर साखर उतारा १०.३३ टक्क्यांवरून ११.५७ टक्क्यांपर्यंत मिळत आहे.

या हंगामातील आजचा साखर उतारा १२.७४ टक्के  आणि आजअखेर ११.१४ टक्के आहे. गळीत हंगाम अद्याप चालू आहे. कारखान्याचे विविध ऊस विकास योजनेंतर्गत सामूहिक ऊस शेती पथदर्शक प्रकल्प पिंपळनेर पंच समितीचे अध्यक्ष सुदाम पगारे व लाभार्थ्यांच्या सहकार्याने यशस्वी प्रयोग झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी सांगितले.

एकरी ऊस उत्पादनात वाढ आणि मार्गदर्शन सुलभ होण्याच्या दृष्टीने कारखान्याच्या सहकार्याने फड बागायतीत १०० लाभार्थ्यांनी त्यांच्या १५० एकर क्षेत्रावर कारखान्याचे ऊस विकास योजनेंतर्गत सामूहिक शेतीची संकल्पना पंच कमिटी नेमणूक करून सामूहिक शेतीचा हा प्रथम प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून हा आपला प्रयोग आदर्श मानून कार्यक्षेत्रात शक्य होईल, तेथे प्रकल्प राबविले जातील. त्यासाठी उत्पादकांचे सहकार्य आवश्यक राहील, असे सांगण्यात आले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष सावंत, संचालक कैलास सावंत, शेतकी अधिकारी विजय पगार, ऊस विकास अधिकारी वसंतराव माळी, परिसरातील शेतकरी, ऊस तोड कामगार उपस्थित होते.