‘४जी’ सेवेसाठी केंद्र सरकार ‘बीएसएनएल’ला २८ हजार कोटींची मदत करणार आहे.
नागपूर : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही केंद्र सरकारची दूरसंचार कंपनी बंद करण्याच्या किंवा खासगीकरण करण्याच्या चर्चेला जोर चढला असताच केंद्र सरकार ‘बीएसएनएल’ला २८ हजार कोटींची मदत करणार असून देशभरात लवकरच ‘४जी’ सेवा सुरू होणार असल्याची माहिती महाप्रबंधक यश पान्हेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.‘बीएसएनएल’ १ ऑक्टोबरला आपला २३ वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. संस्थेचा गौरवशाली इतिहास असला तरी घटती ग्राहकसंख्या, वाढता खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा ताळमेळ राखता न आल्याने ‘बीएसएनएल’ आपल्या अखेरच्या घटका मोजते आहे. त्यामुळे ती बंद होण्याच्या चर्चाही होत्या.
मात्र, केंद्र सरकारने नुकतीच १.६४ कोटींची मदत ‘बीएसएनएल’ला केल्याचे पान्हेकर यांनी सांगितले. तर भविष्यात २८ हजार कोटींची मदत केली जाणार आहे. यानुसार देशभरात ‘४जी’ सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारे उपकरण हे भारतात तयार केले जावेत, अशी अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे ‘४जी’ सेवेसाठी आवश्यक असणारे उपकरण तयार करण्याचे काम हे ‘टीसीएस’ला देण्यात आले आहे.
ही संस्था लवकरच आवश्यक असे ‘स्पेक्ट्रम’ तयार करून देणार आहे. प्रथम मोठ्या शहरांमध्ये आणि नंतर ग्रामीण भागातही ‘४जी’ सेवा सुरू होणार असल्याचे पान्हेकर यांनी सांगितले. याच उपकरणांच्या आधारे ‘५जी’ सेवाही सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. देशातील २६ हजार गावे ही सध्याही भ्रमणध्वनी सेवेपासून वंचित आहेत. तेथे कुठल्याही प्रकारची सेवा नाही. त्यामुळे अशा २६ हजार गावांना जोडण्याचा मानस ‘बीएसएनएल’ने ठेवला आहे. यासाठी ‘बीएसएनएल’सोबत ‘बीबीएनएल’(भारत नेट) मदत करणार आहे. याशिवाय ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांमध्ये वाढ होत असल्याचेही पान्हेकर यांनी सांगितले.