बीडमध्ये अंधश्रद्धेच्या संशयातून विद्यार्थ्याचा बळी, ZP शाळेच्या आवारात आढळून आला मृतदेह

अंधश्रद्धेच्या संशयातून विद्यार्थ्याचा बळी

धनराज सपकाळ या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी रत्नागिरी (ता.बीड) येथील  जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली. धनराजच्या कुटुंबियांनी या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. रात्री उशिरा अहवालातून त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर अंधश्रद्धेच्या संशयातून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

बीड तालुक्यातील नेकनुरपासुन जवळच असलेल्या रत्नागिरी येथील धनराज मोतीराम सपकाळ (वय 6) हा  नेहमीप्रमाणे बहिणीसोबत शाळेत गेला होता. साडेअकराच्या सुमारास सर्व विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत होते. अचानक धनराज सपकाळ दिसेनासा झाला. यावेळी त्याचा शोध घेतला असता शाळेच्या आवारातच तो मृत अवस्थेत आढळुन आला.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनीही जुन्या भांडणातून ‘ त्या ’ बालकाचा खून केला असल्याचे सांगितले. आमच्या म्हैसला करणी करून तिला ठार मारण्यात आले होते आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्याला ठार मारले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. रोहिदास सपकाळ यांचे घर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असून बुधवारी धनराज शाळेला आला असता त्याला उचलून रोहिदास यांने स्वत: च्या घरामध्ये नेले आणि तिथेच त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आणून ठेवल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला