भाजपाचा नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा? गिरीश महाजनांच्या विधानामुळे संभ्रम वाढला; म्हणाले “पाठिंबा देऊ तो…”

Nashik Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Nashik Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. या जागेसाठी महाविकास आघाडी तसेच भाजपा नेमका कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यासाठी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ठाण मांडले आहे. त्यांनी भाजपा पक्षातील सर्व अपक्ष उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. असे असतानाच नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपा कोणाला पाठिंबा देणार यावर बोलताना गिरीश महाजन यांनी सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

“आम्ही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यास सांगत आहोत. मात्र ही माघार नेमकी कोणासाठी आहे, हे अद्याप मलाही समजलेले नाही. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी मला जसे सांगितले तसेच मी केले. सत्यजित तांबे यांना आम्हाला पाठिंब्यासाठी मागणी केली आणि भाजपाकडून त्यांना हिरवा कंदील मिळाला तर ते आमचे उमेदवार असतील,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

“मात्र आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ तो मोठ्या मताधिक्याने निवडणून येणार. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सत्यजित तांबे यांचेही होणार निलंबन

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांचे पक्षातर्फे निलंबन केले जाऊ शकते. तर विद्यामान आमदार तसेच एबी फॉर्म भरूनही उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या डॉ. सुधीर तांबे यांच्यावर याआधीच काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.