“राजकारणाचे हे रक्ताळलेले रूप आहे”
विधानसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु असून यावरुन आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. दरम्यान शिवसेनेने यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. प. बंगालची ही परंपरा आहे असे म्हणायचे तर मग रवींद्र संगीत, रवींद्रनाथ टागोर, बंगालची साहित्य-संस्कृती, सामाजिक सुधारणांचा प्रवाह, स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीची मशाल हे सर्व वाया गेले काय? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले अशी टीका शिवसेनेने केली आहे. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता? प. बंगालात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखणे हे ममता बॅनर्जींइतकेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे, याचा विसर कोणाला पडला आहे काय? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.
काय आहे संपादकीयमध्ये –
“बंगालात नेमके काय सुरू आहे? व जे सुरू आहे त्यामागचे अदृश्य हात कोणाचे आहेत, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. प. बंगालात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यापासून हिंसाचार उसळल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे लोक भाजप कार्यकर्त्यांना जागोजाग बदडत असल्याचे सांगितले जात आहे. तो अपप्रचार आहे. बंगालातील हिंसाचारात आतापर्यंत सतरा जण मरण पावले. त्यात नऊजण भाजपाशी संबंधित आहेत. उर्वरित मृत हे तृणमूलचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे हल्ले दोन्ही बाजूंनी सुरू आहेत, पण भाजपाचे प्रचारतंत्र जोमात असते इतकेच. अनेकांची डोकी फुटली. घरेदारे जाळण्यात आली, असे भाजपातर्फे प्रसिद्ध केले जात आहे. बंगालातील हिंसाचाराने चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी तेथील राज्यपाल जगदीश धनगड यांना फोन करून माहिती घेतली. भाजपाचा एक ज्येष्ठ पदाधिकारी थेट हायकोर्टात गेला व बंगालातील हिंसाचारास ममता बॅनर्जी जबाबदार असून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली. हे असे रडीचे खेळ बंगालात सुरू झाले आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराविरोधात भाजपाने मंगळवारी देशभर धरणे आंदोलने केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा हे घाईघाईने कोलकात्यात पोहोचले व त्यांनी हिंसाचाराचे खापर ममतांवर फोडले. डॉ. नड्डा हे संयमी नेते आहेत. त्यांचा पिंड आकांडतांडव करण्याचा नाही, पण बंगालचा पराभव पचवता येत नाही. याचे दुःख त्यांच्या मनात खदखदत असेल तर तो मानवी स्वभाव आहे. डॉ. नड्डा यांना बंगालातील हिंसाचाराबाबत मानवाधिकाराची आठवण आली. ते सांगतात की, बंगालमध्ये राज्य पुरस्कृत हिंसाचार सुरू असताना अनेक राजकीय पक्ष शांत बसले आहेत. त्याचप्रमाणे देशातील मानवाधिकाराचे ‘चॅम्पियन्स’ या हिंसाचाराविरोधात बोलायला तयार नाहीत. डॉ. नड्डा यांनी मानवाधिकाराची भाषा करून निवडणूक प्रचारातील मढी उकरून काढली ते बरे केले. आज जो हिंसाचार उसळला असल्याचे छाती पिटून सांगितले जाते त्याचे मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
“बंगालातील भाजप नेत्यांनी प्रचारात ताळतंत्र सोडला होता. हिंसेचे खुले समर्थन हे लोक करीत होते. हिंसा करा, खूनखराबा करा, पण निवडणुका जिंका असे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना जणू आदेशच होते. भाजपचे बंगालचे प्रांताध्यक्ष दिलीप घोष हे प्रचार सभांतून जाहीरपणे काय बोलत होते? ते सांगत होते, ‘‘आम्हीच जिंकणार; आम्ही जिंकल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवर कुत्र्यांप्रमाणे गोळय़ा मारू!’’ संसदेचे सदस्य असलेल्या व भाजपचे राज्यातील नेतृत्व करणाऱया दिलीप घोष यांची ही चिथावणी आहे. हेच दिलीप घोष एके ठिकाणी जाहीरपणे सांगतात की, ‘‘डायरीत लिहून ठेवा, तृणमूल कार्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही.’’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवी वस्त्रं परिधान करतात ते एक तपस्वी किंवा संन्यस्त वगैरे आहेत हे बाजूला ठेवा, पण एका राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. हे मुख्यमंत्री दुसऱया राज्यात जाऊन धमक्या देतात. बंगालात जाऊन योगी महाराज धमकावतात की, ‘2 मे नंतर तृणमूलचे कार्यकर्ते आमच्याकडे जीवाची भीक मागतील.’ या धमकीचा अर्थ काय समजायचा? म्हणजे भाजपचा विजय झालाच असता तर तृणमूल कार्यकर्त्यांचे रक्ताचे पाट वाहिले असते व जीवाची भीक मागणाऱया तृणमूल कार्यकर्त्यांकडे पाहून या मंडळींना आसुरी आनंद मिळाला असता. राजकारणाचे हे रक्ताळलेले रूप आहे,” असा संताप शिवसेनेने व्यक्त केला आहे.
“ही लोकशाही वगैरे नसून ठोकशाही आहे. प. बंगालातील हिंसाचाराचे समर्थन कोणीच करणार नाही. निवडणुका संपल्यावर वैर संपायला हवे, पण ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या क्षणापर्यंत राज्यात निवडणूक आयोगाचे, म्हणजे केंद्राचेच राज्य होते व कायदा-सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाच्या हातात होती. ममता बॅनर्जी यांना काहीच हालचाल करता येऊ नये म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांपासून अनेक अधिकाऱयांना निवडणूक आयोगाने हटवले. मग राज्यातील हिंसाचाराची जबाबदारी नक्की कोणाची?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.
“तृणमूल काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. भाजपावाले रंगवतात तितके हिंसाचाराचे चित्र भेसूर नाही. जेथे भाजपाचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय?,” अशी शंका शिवसेनेने उपस्थित केली आहे.