भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजनांविरुध्द गुन्हा

म.वि.प्र. संस्थेच्या वादात आमिष देत धमकावल्याचा आरोप

प्रतिनिधी, जळगाव

भाजपाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१८मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल ८ डिसेंबरला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर, मध्यंतरी भोईटे गटाला तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

नक्की काय घडलं?

अ‍ॅड. विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०१८ मध्ये त्यांना निलेश भोईटे यांनी फोन करुन संस्थेचे जुने रेकॉर्ड देण्याबाबत सांगितले. हे रेकॉर्ड तानाजी भोईटे यांच्याकडे असून ते सध्या पुण्यात आहेत. तुम्ही पुण्यात जाऊन त्यांची भेट घ्या व त्यांच्याकडून संस्थेचे जुने रेकॉर्ड घ्या असे निलेश भोईटे यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. पाटील हे नरेंद्र पाटील यांच्याशी बोलून तीन-चार दिवसानंतर रेकॉर्ड घेण्यासाठी महेश पाटील यांच्यासह कारने पुण्याला गेले. तानाजी भोईटे यांनी पाटील यांना कोथरुड परिसरातील हॉटेल किमया येथे बोलावले. या ठिकाणी तानाजी भोईटे, निलेश भोईट, शिवाजी भोईटे, विरेंद्र भोईटे, रामेश्वर नाईक हे थांबलेले होते. हॉटेलात भेटीच्या वेळी तानाजी भोईटे यांनी, ही संस्था गिरीश भाऊला हवी आहे, भाऊ एक कोटी रुपये देण्यास तयार आहेत, असा निरोप पाटील यांना दिला. अ‍ॅड. पाटील यांनी यावर नकार दिल्यानंतर रामेश्वर नाईक याने स्वत:च्या मोबाईलवरुन गिरीश महाजन यांना व्हिडीओ कॉल केला. ‘तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन ही संस्था निलेश भोईटेच्या ताब्यात देऊन टाक, तुझा विषय संपवून टाक, असे महाजन यांनी व्हिडीओ कॉलवर अ‍ॅड. पाटील यांना सांगितले.

हे वाचले का?  Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

ही बाब मान्य नसल्यामुळे अ‍ॅड. पाटील व महेश पाटील तेथून जाण्यासाठी निघाले असता भोईटे यांनी त्यांना थांबवले. नाराज होऊ नका तुम्हाला रेकॉर्ड देऊन टाकतो, असे सांगून कारमध्ये बसवून त्यांना दुसऱ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर जयवंत भोईटे, निळकंठ काटकर, गणेश कोळी उर्फ गणेश मेंबर, सुनिल झंवर, विराज भोईटे हेदेखील उभे होते. धावत्या कारमध्ये रामेश्वर नाईक याने अ‍ॅड. पाटील यांना चापट मारुन गळ्यावर चाकू लावून धाक दाखवला. यानंतर सुनिल झंवर यानीही, संस्था सोडून द्या. मुकाट्याने सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन निलेशकडे देऊन टाका अन्यथा परिणाम वाईट होतील. गिरीशभाऊंनी यांना बसविले आहे. हे तुला माहित नाही का? गिरीशभाउंचा खास माणूस आहे, अशी धमकी दिली. यावेळी विरेंद्र भोईटेने पाटील यांच्यावर पायावर लाथ मारली आणि कानशिलात लगावली तसेच, अर्वाच्च शिवीगाळ केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

अ‍ॅड. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता तो गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.