भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकसाठी शाही तयारी

जवळपास सात वर्षांनी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणीत सहभागी होणारे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.

नाशिक – जवळपास सात वर्षांनी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणीत सहभागी होणारे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. वातानुकुलीत सभागृह, हिरवळीचे मैदान आणि डुबकी मारण्यासाठी जलतरण तलाव, अशा सुविधांनी सुसज्ज बैठक स्थळाने सत्तेचा मानमरातब राखला जाणार आहे. यात केंद्र आणि राज्यातील मंत्री, खासदार, आमदार व प्रदेश पदाधिकारी असे तब्बल हजारांहून अधिक जण सहभागी होतील. नियोजनात कुठलीही कसर राहू नये, म्हणून व्यवस्थानिहाय जबाबदारी पदाधिकाऱ्यांना दिली गेली आहे. यात द्रव्य संकलनाची धुरा स्थानिक मंत्री, आमदार, ज्येष्ठांसह उद्योजक पदाधिकारी यांच्यावर आली आहे.

भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आजपासून दोन येथील दी डेमोक्रसी हॉटेल, रिसॉर्ट व कन्व्हेन्शनल सेंटर येथे होत आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. शनिवारी दिवसभर विस्तृत स्वरुपात संघटनात्मक बाबींवर मंथन केले जाणार आहे. याआधी पंचवटीतील स्वामी नारायण सभागृहात कार्यकारिणीची बैठक झाली होती. नंतर पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक रॉयल हेरिटेजमध्ये पार पडली. २०१६ नंतर कार्यकारिणीच्या आयोजनाचा मान पुन्हा भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकला मिळाला आहे. यावेळी केवळ बैठक स्थळात बदल झाला. व्यवस्थापन समितीने कार्यकारिणीची बैठक यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या व्यवस्थांची जबाबदारी सोपवित काटेकोर नियोजन केले. त्या अनुषंगाने सलग १० ते १२ दिवसांपासून विविध पातळीवर चाललेली तयारी पूर्णत्वास गेली आहे. बैठकीत राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, सुकाणू समिती सदस्य असे सुमारे ११०० जण सहभागी होणार आहेत. त्यामुळे बैठकीसाठी तितक्याच क्षमतेच्या वातानुकूलीत सभागृहाची निवड करावी लागली. सभागृह, व्यासपीठाची जबाबदारी तीन पदाधिकाऱ्यांवर आहे. इतक्या मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची निवास व्यवस्था करणे आव्हानात्मक होते. महिला, पुरूषांसाठी स्वतंत्रपणे नेमलेल्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी नियोजन केले आहे. शासकीय निवास व्यवस्थेची जबाबदारी देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि सीमा हिरे या शहरातील आमदारांनी पेलली. लग्न सराईमुळे अनेक हॉटेलमधील खोल्या आधीच नोंदणीकृत झाल्या असल्याने जिथे जितक्या खोल्या उपलब्ध होतील, तशी नोंदणी करावी लागली. शासकीय विश्रामगृहाच्या जोडीला शहरालगतच्या मुक्त विद्यापीठाच्या विश्रामगृहातील ६५ खोल्या भाजपसाठी आरक्षित झाल्या आहेत.

हे वाचले का?  Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

विश्रामगृह, हॉटेल आणि बैठकीचे स्थळ यात साधारणत: आठ ते १० किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी स्थानिक माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या १०० मोटारींचा ताफा सज्ज असणार आहे. त्याचे नियोजन वाहन व्यवस्थेची धुरा सांभाळणारे करीत आहे. या शिवाय प्रमुख पाहुणे, विशेष व्यक्तींचे भोजन, अन्य पदाधिकाऱ्यांचे भोजन, वैद्यकीय, वाहनतळ व्यवस्था, रेल्वेतून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत, पदाधिकारी नोंदणी, संगणक, स्टेशनरी व फलक रचना आदी कामांची पदाधिकारीनिहाय विभागणी केलेली आहे. बैठकीचे एकूण नियोजन पाहता खर्चाचा आकडा बराच मोठा राहू शकतो. त्यामुळे नियोजनावेळी निधी संकलनाचा व्यवस्थापन समितीने साकल्याने विचार केला होता. त्याची जबाबदारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले या स्थानिक आमदारांसह ज्येष्ठ पदाधिकारी विजय साने, लक्ष्मण सावजी आणि उद्योजक आशिष नहार यांच्यावर सोपविण्यात आली. प्रशस्त सभागृह, चविष्ठ भोजन, उत्तम निवास व्यवस्था आणि निरोपावेळी खास भेट यातून कार्यकारिणीची नाशिकची ही बैठक अविस्मरणीय करण्याची धडपड स्थानिक पदाधिकारी करीत आहेत.

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

अनिकेत साठे