‘इस्कॉन’च्या चिन्मय दास यांना बांगलादेशात अटक झाल्यावर देशभरात प्रतिक्रिया उमटत असताना सोमवारी आरगताळामधील उच्चायुक्तालयात आंदोलक घुसले होते.
ढाका : सोमवारी त्रिपुराची राजधानी आगरताळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या परिसरात आंदोलकांनी धुडगूस घातल्याचे राजनैतिक पडसाद मंगळवारी उमटले. ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना पाचारण करून बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतरीत्या या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली.
‘इस्कॉन’च्या चिन्मय दास यांना बांगलादेशात अटक झाल्यावर देशभरात प्रतिक्रिया उमटत असताना सोमवारी आरगताळामधील उच्चायुक्तालयात आंदोलक घुसले होते. हे भारतीय सुरक्षा यंत्रणेचे अपयश असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र खात्याचे सल्लागार महंमद तौहिद हुसेन यांनी म्हटले आहे. त्यानंतर भारताला बांगलादेशशी स्थिर, सकारात्मक संबंध हवे असल्याचे वर्मा यांनी नमूद केले. दुसरीकडे बांगलादेशात नवे सरकार आले असून, त्याचे पुनर्मूल्यांकन भारताने नव्याने करावे, असा उपहासात्मक सल्ला तेथील कायदा विभागाचे सल्लागार असिफ नाजरुल यांनी दिला. भारत-बांगलादेशमधील मैत्री समानता आणि परस्परांचा आदर करण्यावर आधारित आहे. शेख हसीना यांच्या सरकारने सत्तेत येण्यासाठी भारताला पूरक धोरणे अवलंबली. पण, आता शेख हसिनांचा बांगलादेश नाही. भारताने ही बाब समजून घ्यावी, असे ते म्हणाले. दरम्यान, उच्चायुक्तालयात गोंधळ घालणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. तीन उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले असून एकाची मुख्यालयात बदली करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी दिली.
रम्यान, बांगलादेशमध्ये अटकेत असलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसून, चितगाव न्यायालयात त्यांच्या जामिनावर आता २ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी कोणताही वकील पुढे येत नसल्याने न्यायालयाने जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली.
दास यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र, त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले नाही. सुनावणीवेळी चितगाव न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दास यांचे प्रतिनिधित्व करणारा कुठलाही वकील नसल्यामुळे सत्र न्यायाधीशांनी जामीन अर्जावरील निकालासाठी पुढील तारीख दिल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. राजकीयदृष्ट्या प्रेरित वकिलांच्या गटांच्या धमक्यांमुळे दास यांना कुठलाही वकील मिळाला नसल्याचा दावा त्यांचे सहकारी स्वतंत्र गौरंग दास यांनी केला आहे.
उच्चायुक्तालयांच्या सुरक्षेत वाढ
सुरक्षेच्या कारणास्तव आगरताळा येथील बांगलादेश सहायक उच्चायुक्तालयाच्या सर्व सेवा पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असून तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आगरताळ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. उच्चायुक्तालय आवारात कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रिटनकडून चिंता व्यक्त
लंडन : बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांवर आणि हिंदू नेत्याच्या अटकेवर ब्रिटनने मंगळवारी चिंता व्यक्त केली. मजूर पक्षाचे खासदार बॅरी गार्डिनर यांनी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. हिंद-प्रशांत भागासाठीच्या परराष्ट्र खात्याच्या मंत्री कॅथरिन वेस्ट यांनी सांगितले, की बांगलादेशमधील गेल्या महिन्यामधील भेटीत हंगामी सरकारने अल्पसंख्याकांसाठी मदत उपलब्ध असल्याची माहिती आपल्याला दिली आहे.