संयुक्त राष्ट्राच्या ७७ व्या महासभेत भारताने पाकिस्तानचे पंतप्रधानांना खडे बोल सुनावले.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी काश्मीरमधील शांतता, कलम ३७० तसेच इतर मुद्द्यांना घेऊन भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून संयुक्त राष्ट्रातील भारताचे सचिव मिजितो विनिटो यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानकडून त्यांची गैरकृत्ये लपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचांचा वापर केला जात आहे. जेव्हा सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी खालणे कमी होईल, तेव्हा भारतीय उपखंडात शांतता नांदेल, अशी भूमिका विनिटो यांनी मांडली.
भारतावर खोटे आरोप करण्यासाठी पाकिस्तानने या मंचाचा वापर केला. हे खेदजनक आहे. आपल्या देशातील गैरकृत्ये लपवण्यासाठी तसेच भारताविरोधातील कारवायांचं समर्थन करण्यासाठी पाकिस्तानने या मंचाचा वापर केला आहे. सीमेपलीकडून जेव्हा दरशतवादाचे समर्थन थांबेल, तेव्हा भारतात शांतता, सुरक्षा निश्चित रुपाने नांदेल, अशी भूमिका भारताचे सचिव मिजितो विनिटो यांनी मांडली.
शाहबाज शरिफ यांनी काय आरोप केला होता?
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशानात भारतावर आरोप केले. शाहबाज शरिफ यांनी महासभेत कलम ३७०, कश्मीर मुद्दा उपस्थित केला. रचनात्मक सहभागासाठी भारताने सकारात्मक पाऊलं उचलणे गरजेचे आहे. आपण शेजारी देश आहोत. आपल्याला एकमेकांविरोधात लढायचे आहे की शांततेत राहायचे आहे, हे आपल्यालाच ठरवावे लागेल. शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून आपल्या समस्या, मतभेद यांवर तोडगा गाढणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे, असे शाहबाज शरिफ म्हणाले होते.
सर्व शेजारी राष्ट्रांसोबत आम्हाला शांततापूर्ण संबंध हवे आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. दक्षिण आशियामध्ये दिर्घकालीन शांततापूर्ण वातावरण असावे अशी आमची भूमिका आहे. मात्र त्यावेळी आम्ही जम्मू आणि काश्मीर वादावर तोडगा काढण्याच्या मागणीचेही पुरस्कर्ते आहोत, असेही शहाबाज शरीफ म्हणाले.