भारताविरोधातील आक्रमक धोरण थांबवा!

अमेरिकेच्या संरक्षण विधेयकातून चीनला इशारा

अमेरिकेच्या काँग्रेसने ७४० अब्ज डॉलरच्या संरक्षण धोरण विधेयकाला मंजुरी दिली असून त्यामध्ये चीनच्या सरकारकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताविरोधात सुरू असलेल्या आक्रमकतेचा उल्लेख करण्यात आला आहे.

अमेरिकेन काँग्रेसमधील प्रतिनिधी सभा आणि सिनेटने मंगळवारी राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियम (एनडीएए) मंजूर केले. त्यामध्ये चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या विरोधात जी आक्रमक भूमिका घेतली जात आहे ती संपुष्टात आणावी, असे म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यात गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्ष सुरू आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये संरक्षण धोरण विधेयकामध्ये याबाबतच्या तरतुदीचा मसुदा मांडला  होता. अमेरिकेच्या संरक्षण धोरण विधेयकामध्ये या मुद्दय़ाचा समावेश होणे हा भारताला अमेरिकेचे जोरदार समर्थन असल्याचे सिद्ध होत आहे.

बहुमताने मंजूर..

यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अधिनियमाबाबत नापसंती व्यक्त केली होती. असे असतानाही अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये संरक्षण धोरण विधेयक बहुमताने मंजूर झाल्याने त्याचे अधिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे विधेयक मंजूर करून अमेरिकेने चीनला स्पष्ट संदेश दिल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

एनडीएएमध्ये आपल्या तरतुदीचा समावेश करून आणि त्याचे कायद्यात रूपांतर करून अमेरिकेच्या सरकारने चीनला स्पष्ट इशारा दिला आहे की, चीनने भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यास ते सहन केले जाणार नाही, असे राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.