भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; दैनंदिन रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक

देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक

देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख १५ हजार ७३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी ५ एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २८ लाख १ हजार ७८५ इतकी झाली आहे.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. करोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. दरम्यान देशातील अॅक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ४७३ वर पोहोचली आहे.करोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गेल्या २४ तासात ६३१ मृत्यू झाले आहेत. भारतात आतापर्यंत १ लाख ६६ हजार १७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

दरम्यान महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५५ हजार रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत ५१०० नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांचा गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद
देशातील करोनास्थिती आणि लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. लसीकरणाचा वेग वाढविण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी १७ मार्चला पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घेतला होता. पंतप्रधानांनी रविवारीही उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यात त्यांनी रुग्णवाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती.

हे वाचले का?  आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या अडचणी वाढल्या, खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल