भारतीय महिला संघाची अर्जेटिनाशी बरोबरी

अर्जेटिना दौऱ्यावरील हा भारताचा चौथा सामना आहे. शनिवारी तिसरा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला.

अर्जेटिनाचा हॉकी दौरा

भारतीय महिला हॉकी संघाने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करीत रविवारी जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील अर्जेटिनाला १-१ असे बरोबरीत रोखले.

कर्णधार राणी रामपालने ३५व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले, परंतु एमिलिया फोर्शेरिओने पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल करीत अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. अर्जेटिना दौऱ्यावरील हा भारताचा चौथा सामना आहे. शनिवारी तिसरा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला.

अर्जेटिनाच्या अनुभवी संघाने पहिल्या सत्रात वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. अर्जेटिनाच्या आक्रमणाने भारतीय बचावावर दडपण आणत तीन मिनिटांच्या अंतरावर दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळवले, परंतु भारतीय गोलरक्षक सविताने ते वाचवले. भारतालाही ११व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात भारताला अपयश आले.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

दुसऱ्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला राणीकडे गोल करण्याची आणखी एक संधी चालून आली. आक्रमक वंदना कटारियाने तिला साहाय्य केले, परंतु अर्जेटिनाच्या भक्कम बचावामुळे गोल साकारण्यात पुन्हा अपयश आले. मग २३व्या आणि २४व्या मिनिटाला अर्जेटिनाला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु सविताने खंबीरपणे गोलरक्षण करीत हे प्रयत्न हाणून पाडले.

तिसऱ्या सत्रात भारताने आक्रमक सुरुवात केली. वंदनाच्या साहाय्यामुळे राणीने भारताला गोल नोंदवून दिला. त्यानंतर ३९व्या आणि ५०व्या मिनिटाला भारताला मिळालेले दोन्ही प्रयत्न वाया गेले. अर्जेटिनाच्या एमिलियाने ५५व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करीत बरोबरी साधली. त्यानंतर दडपण वाढल्यामुळे ५६व्या आणि ५९व्या मिनिटाला भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर सहन करावे लागले, पण अर्जेटिनाच्या आक्रमकांना त्याचा उपयोग करता आला नाही.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

भारताने १-० अशी आघाडी घेतल्यानंतर अधिक दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करण्याची आवश्यकता होती, परंतु यात अपयश आले. यावरच खेळाडूंनी मेहनत घेण्याची आता आवश्यकता आहे. पुढील सामन्यात आम्ही कामगिरीत सुधारणा करू.

-शोर्ड मरिन, भारताचे मुख्य प्रशिक्षक