भारतीय वंशाची संशोधक ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी

टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.

न्यूयॉर्क :भारतीय -अमेरिकी वंशाच्या गीतांजली राव या पंधरा वर्षांच्या संशोधक मुलीस ‘टाइम’चा पहिलाच ‘किड ऑफ दी इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.

टाइम नियतकालिकाने म्हटले आहे की,  हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजलीने आभासी मुलाखतीत सांगितले. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली असून गप्पांमधूनही तिच्या बुद्धीची चमक प्रत्ययास आली.

‘ प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा,’ असा  संदेश तिने तरुणांना दिला.

‘जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकाल ’, असा आशावाद तिने व्यक्त केला. कधी न पाहिलेल्या समस्या आमच्या नवीन पिढीपुढे आहेत असे सांगून ती म्हणाली की, काही जुन्या समस्याही अजून आहेत. करोनाची साथ ही एक महत्वाची समस्या आहे. मानवी हक्कांचे विषय आहेत. काही प्रश्न आपण तयार केलेले  नाहीत, पण ते सोडवावे लागतील. त्यात सायबर गुन्हेगारी, हवामान बदल यांचा समावेश आहे. हे प्रश्न तंत्रज्ञानामुळे निर्माण झाले असे तिने स्पष्ट केले.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

सर्वाच्या मुखावर हास्य असावे, त्यासाठी त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, असे सांगून ती म्हणाली की, समाजात सकारात्मकता निर्माण करणे गरजेचे आहे.  मी माझी स्वत:ची उपकरणे तयार करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. दुसरी- तिसरीत असताना मी विज्ञान तंत्रज्ञानाने सामाजिक बदल कसे करता येतील हा विचार सुरू केला असे तिने स्पष्ट केले.  दहावीत असताना तिने आईवडिलांना कार्बन नॅनोटय़ूब संवेदक तंत्रज्ञानाबाबत संशोधन करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

एकावेळी अनेक गोष्टींचा विचार करू नका. एकाच गोष्टीचा विचार करा, भले ती लहान का असेना. ती आपल्या आवडीची असावी. त्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मोठे काही तरी करण्याच्या दबावाला बळी पडू नका.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

– गीतांजली राव