भारतीय संघात तीन बदल?

रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाद नदीम यांच्या जागी अनुक्रमे मयांक अगरवाल, कुलदीप यादव किंवा राहुल चहर आणि अक्षर पटेल

एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल होण्याची चिन्हे आहेत. रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाद नदीम यांच्या जागी अनुक्रमे मयांक अगरवाल, कुलदीप यादव किंवा राहुल चहर आणि अक्षर पटेल यांची निवड होण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी मानहानीकारक पराभव पत्करला. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधील आशा जिवंत राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.  पहिल्या कसोटी सामन्यात प्रभाव दाखवू न शकलेल्या नदीमची जागा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर निश्चितपणे घेऊ शकेल. याचप्रमाणे सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार सलामी देण्यात अपयशी ठरलेल्या रोहितचे स्थानही धोक्यात आहे. पहिल्या कसोटीत रोहितने दोन डावांत अनुक्रमे ६ आणि १२ धावाच केल्या. रोहितने ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटीत २६ आणि ५२ धावा केल्या, तर चौथ्या कसोटीत ४४ आणि ७ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागी मयांकचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच वॉशिंग्टनच्या जागी मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीपचा समावेश केला जाऊ शकतो.

हे वाचले का?  AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी

‘‘गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून सावरून अक्षरने सरावाला प्रारंभ केला आहे. पहिल्या कसोटीसाठीही अक्षरचा आम्ही प्राधान्याने विचार करीत होतो, परंतु दुखापतीमुळे नदीमला संधी मिळाली,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी सांगितले.

पहिल्या कसोटीत नदीमने दोन्ही डावांत मिळून ५९ षटकांत २३३ धावा दिल्या आणि फक्त चार बळी मिळवले. वॉशिंग्टनने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात २६ षटकांत ९८ धावा दिल्या, तर दुसऱ्या डावात एकमेव षटक टाकले, परंतु त्याच्या खात्यावर एकही बळी जमा झाला नाही. २१ वर्षीय वॉशिंग्टनने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि चेन्नईत इंग्लंडविरुद्ध साकारलेल्या दोन खेळींच्या बळावर त्याला स्थान टिकवता येऊ शकेल.

हे वाचले का?  Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?

‘‘भारताच्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या गोलंदाजाकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे इंग्लंडवर दडपण आणण्यासाठी गोलंदाजीच्या फळीत बदल करण्याची आवश्यकता आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा / मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर/ कुलदीप यादव, अक्षर पटेल, इशांत शर्मा, जसप्रित बुमरा.

ट्वेन्टी-२० संघात बटलर, बेअरस्टोचे पुनरागमन

लंडन : अहमदाबाद येथे भारताविरुद्ध होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. संघ : ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीसी, टॉपले, मार्क वूड.