भारत-जर्मनीदरम्यान महत्त्वाचा गतिशीलता भागीदारी करार

भारत आणि जर्मनीने सोमवारी उभय देशांतील नागरिकांना दोन्ही देशांत शिक्षण, संशोधन व काम करण्यास सुलभता येण्यासाठी उपयोगी स्थलांतर गतिशीलता भागीदारी करारावर (मायग्रेशन अ‍ॅण्ड मोबिलिटी पार्टनरशिप अ‍ॅग्रिमेंट) स्वाक्षरी केली.

उभय देशवासीयांना दोन्ही देशांत प्रवास सुलभ 

पीटीआय, नवी दिल्ली : भारत आणि जर्मनीने सोमवारी उभय देशांतील नागरिकांना दोन्ही देशांत शिक्षण, संशोधन व काम करण्यास सुलभता येण्यासाठी उपयोगी स्थलांतर गतिशीलता भागीदारी करारावर (मायग्रेशन अ‍ॅण्ड मोबिलिटी पार्टनरशिप अ‍ॅग्रिमेंट) स्वाक्षरी केली. या वेळी उभय देशांतील परराष्ट्रमंत्र्यांत भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशातील देशांचे प्रश्न, युक्रेन संघर्ष, अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानशी संबंधित मुद्दे आणि सीरियातील परिस्थिती यांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर विचारविनिमय झाला.

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

 ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलासह द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावरही या वेळी चर्चा झाली. या बैठकीनंतर जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बेयरबॉक यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, की गतिशीलता भागीदारी करारामुळे एकमेकांच्या देशात अभ्यास, संशोधन आणि काम करणे सोपे होईल आणि हा करार अधिक कालसुसंगत होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. दोन देशांमधील भक्कम द्विपक्षीय भागीदारीचे हे संकेत आहेत. भारताने जी-२० गटाचे अध्यक्षपद चार दिवसांपूर्वी स्वीकारले. या पार्श्वभूमीवर बेयरबॉक दोन दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी भारतात आल्या आहेत. भारत रशियाकडून खनिज तेल का खरेदी करत आहे, असा प्रश्न जयशंकर यांना या वेळी विचारण्यात आला. त्यांनी या वेळी भारत रशियाकडून करत असलेल्या खनिज तेलाच्या आयातीचे जोरदार समर्थन केले. हा मुद्दा बाजाराशी संबंधित घटकांवर अवलंबून असतो. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या काळात युरोपियन संघांतील सदस्य देशांनी रशियाकडून भारतापेक्षा जास्त जिवाश्म इंधन आयात केले. त्याच वेळी, बेयरबॉक म्हणाल्या की, सध्या जग कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तेव्हा आपण एकजुटीने वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. या प्रदेशातील चीनच्या आव्हानांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जर्मन परराष्ट्रमंत्र्यांनी हे धोके नीट समजून घेण्याची गरज प्रतिपादित केली. त्यांनी चीनचे अनेक क्षेत्रांतील स्पर्धक असे वर्णन केले.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

जयशंकर म्हणाले, की आम्ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा केली, ज्यात सीमेपलीकडील दहशतवादाशी संबंधित विषयांचा समावेश होता. सीमेपलीकडून दहशतवाद सुरू राहिल्यास पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही. भारत-प्रशांत महासागरीय देशांचे प्रश्न व इराणच्या मुद्दय़ावरही चर्चा केल्याचे जयशंकर यांनी या वेळी सांगितले.