भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह चिंचपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर कोळदे ते चिंचपाडा दरम्यान पाणी आले. रेल्वेमार्गावर मातीचा भराव वाहून आल्याने चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू रेल्वे रुळावर मातीमध्ये रुतली आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली रेल्वे मार्गाला संरक्षक भिंत नसल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आले. पाण्याबरोबर मातीचा ढिगारा देखील वाहून आला. त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी आणि माती मोठ्या प्रमाणात साचली. रेल्वेरुळ मातीखाली गेल्याने मालगाडी रेल्वे रुळावरच अडकली. त्यामुळे सुरत- भुसावळ मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. सुरतहून भुसावळकडे जाणारी वाहतूक सकाळी बंद करण्यात आली होती. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरत- भुसावळ रेल्वे सेवा सेवा विस्कळीत झाली.