भूकंप जाणवणाऱ्या भागात चार नव्या वेधशाळा ; राज्यातील भूकंपमापन वेधशाळांची पुनर्रचना; नऊ वेधशाळा बंद, तर २६ अद्ययावत होणार

पुनर्रचनेत अस्तित्वातील ३५ पैकी नऊ भूकंप वेधशाळा कायमस्वरूपी बंद केल्या जातील. तर उर्वरित २६ अद्ययावत करून सुरू ठेवण्यात येतील.

नाशिक : राज्यातील धरणांची सुरक्षितता जपण्यासाठी उभारलेल्या भूकंपमापन वेधशाळांची नव्याने पुनर्रचना करण्यात आली असून बंद पडलेल्या उपकरणांमुळे भूकंपाचा केंद्रिबदू शोधण्यात निर्माण झालेला अडसर आधुनिक उपकरणांनी लवकरच दूर होणार आहे. पुनर्रचनेत अस्तित्वातील ३५ पैकी नऊ भूकंप वेधशाळा कायमस्वरूपी बंद केल्या जातील. तर उर्वरित २६ अद्ययावत करून सुरू ठेवण्यात येतील. याशिवाय लोअर दुधना, पुनद, गिरणा आणि जिगाव या प्रकल्पांच्या क्षेत्रात भूकंप जाणवत आहे. या ठिकाणी नव्याने चार अद्ययावत वेधशाळा कार्यान्वित करून राज्यातील वेधशाळांची श्रृंखला ३० पर्यंत सीमित राखली जाणार आहे. देशातील महत्त्वाच्या कोयना धरणासोबत गोसीखुर्द, जायकवाडी, अप्पर वर्धा, उजनी आदी धरणांच्या क्षेत्रातील भूकंपीय वेधशाळांच्या अद्ययावतीकरणाची सुरुवात नाशिकमधून झाली आहे.

अलीकडेच जिल्ह्यात काही दिवसांच्या अंतराने भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यांची नोंद महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) भूकंपमापन केंद्रात झाली. मात्र त्याचा केंद्रिबदू शोधता आला नव्हता. धक्क्याची तीन, चार केंद्रांवर नोंद झाल्याशिवाय केंद्रिबदू काढता येत नाही. राज्यातील २३ केंद्रांतील उपकरणे बंद असल्याने भूकंप आघात सामग्री आणि पृथक्करण विभाग केंद्रिबदू शोधण्यात असमर्थ ठरत होता. बंद उपकरणांच्या जागी नवीन डिजिटल यंत्रणा बसविल्यास भूगर्भातील अतिसूक्ष्म हालचालींची माहिती तात्काळ मिळू शकते. त्यामुळे सर्व वेधशाळांत आधुनिक यंत्रणा बसवून माहिती संकलनासाठी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव या विभागाने दशकभरापूर्वी दिला होता. प्रदीर्घ काळापासून रखडलेला हा विषय शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारसीनंतर नुकताच मार्गी लागला. वेधशाळांच्या संख्येत फेरबदल करून भूकंपमापन केंद्रात आधुनिक यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नाशिक आणि इसापूर येथील नवी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. अन्य २८ वेधशाळेत हे काम प्रगतिपथावर असल्याचे मेरीतील संशोधन अधिकारी चारुलता चौधरी यांनी सांगितले.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

धरण सुरक्षितता संघटनेच्या अंतर्गत भूकंप आघात सामग्री आणि पृथक्करण कक्ष कार्यरत आहे. धरणांच्या सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व खोऱ्यांत ३५ भूकंपमापन वेधशाळा स्थापन केल्या होत्या. यातील जुनाट यंत्रणा बंद पडत चालल्याने भूगर्भातील हालचालींचा अभ्यास, भूकंपाचा केंद्रिबदू शोधणे जिकिरीचे झाले होते. नव्या यंत्रणेमुळे हा अडसर दूर होईल. पुनर्रचनेत वेधशाळांची एकूण संख्या पाचने कमी होईल. आधुनिक यंत्रणेमुळे भूकंप तत्क्षणी माहिती मिळेल. त्याकरिता मनुष्यबळाची आवश्यकता नाही. संपूर्ण राज्यातील माहिती विशिष्ट प्रणालीने प्राप्त होईल. त्यामुळे तिचे संकलन, केंद्रिबदू काढणे आणि भूकंपाच्या वारंवारितेत काही बदल झाल्यास ते त्वरित काढणे दृष्टीपथास येणार आहे. भूकंपीय धक्क्याच्या माहितीतून निष्कर्ष काढणे व त्याच्या विश्लेषणाची जबाबदारी उपकरणे संशोधन विभागाकडे राहणार आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

पुनर्रचना कशी?

राज्यात अस्तित्वातील ३५ पैकी लाहे, मराठवाडी, वशाला, साखरपा, अलोरे, चिपळूण, भटाळा प्रकल्प, सिरपूर (बाघ प्रकल्प), पेंच (कामटीखैरी) या नऊ वेधशाळा बंद केल्या जाणार आहेत. उर्वरित कोयना, कोनलकट्टा, भिमानगर (उजनी), नाशिक, जायकवाडी (नाथसागर), पार्डी (अप्पर वर्धा), इसापूर, अक्कलपाडासह २६ वेधशाळा आधुनिक (डिजिटल) उपकरणांनी सुसज्ज केल्या जातील. त्या व्यतिरिक्त लोअर दुधना, पुनद, गिरणा  जिगाव प्रकल्प क्षेत्रात नव्याने भूकंप मालिका जाणवत असल्याने तिथे अद्ययावत भूकंप वेधशाळा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. या माध्यमातून मेरीच्या अंतर्गत राज्यात ३० अद्ययावत भूकंप मापन वेधशाळांची श्रृंखला अस्तित्वात येईल. टेलिमेट्रीच्या यंत्रणेमुळे कुठेही भूकंपाचे धक्के जाणवले तरी त्याच वेळी त्याची माहिती उपलब्ध होईल.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

वेधशाळा गुंडाळण्याची शिफारस अमान्य : राज्यातील वेधशाळांनी संकलित केलेल्या माहितीचा मध्यवर्ती संकल्प चित्र मंडळाने कोणत्याही संकल्पचित्रांमध्ये उपयोग केला नाही. त्यामुळे भूकंपीय वेधशाळांचे जाळे उभारण्याची आवश्यकता नसल्याची अजब शिफारस जलविज्ञान आणि सुरक्षितता (संकल्पन प्रशिक्षण) विभागाचे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शासनाला केली होती. अर्थात ती अमान्य करण्यात आली. भूकंपाच्या नोंदी, त्यांची तीव्रता, ठिकाण ही माहिती भूकंपाच्या पूर्वानुमान संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून प्रकल्प बांधकामाच्या संकल्पचित्रात तिचे योगदान राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.