जुन्या पेन्शनसह मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असून ती भरण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षानंतर दिली जाणारी श्रेणी लवकरात लवकर देण्यात यावी.
नाशिक – जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मंगळवारपासून राज्यभर होणाऱ्या बेमुदत संपात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा शिक्षकेतर संघटना व त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व संघटना सहभागी होणार आहेत.
जुन्या पेन्शनसह मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असून ती भरण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षानंतर दिली जाणारी श्रेणी लवकरात लवकर देण्यात यावी. विनाअनुदानीत शाळेवरून अंशतः आणि पूर्ण अनुदानित शाळेवर शिक्षकेतर भरतीवर असलेली बंदी हटविण्यात यावी. टप्पा अनुदानावर असणाऱ्या सर्व शाळांना विनाअट पुढील टप्पा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संपावर जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांनी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा टीडीएफ, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा शिक्षकेतर संघटना, जिल्हा शिक्षक सेना, जिल्हा जुनी पेन्शन संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य इस्तू संघटना, जिल्हा कास्ट्राईब संघटना, जिल्हा कला विजन, जिल्हा प्रयोगशाळा सहाय्यक संघटना, जिल्हा ग्रंथपाल संघटना आदींनी केले आहे.