मतदानाच्या दिवशीच भाजपा नेते बावनकुळेंनी अजित पवारांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

आज सकाळी नऊ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी देखील वेगवान राजकीय घडमोडी घडत आहेत.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. ऐन निवडणुकीच्या दिवशीच बावनकुळे यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवारांची भेट घेतल्यानंतर याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता, त्यांनी स्मितहास्य करत अजित दादांकडे नागपुरचं एक काम होतं, असं म्हटलं आहे. मतदानाच्या दिवशी नागपुरचं काम कसं काय काढलं? असा सवाल विचारला असता. ते म्हणाले, “आजचं मतदान झालं. १ लाख टक्के भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहे. पाचवा उमेदवार हा इतर दहा उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मतांनी निवडून येईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेचा विजय हा राज्यसभेपेक्षा मोठा विजय असणार आहे, असंही ते म्हणाले.दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची देखील गळाभेट घेतली आहे. बावनकुळे यांनी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आजच्या निवडणुकीत कोणाचा उमेदवार पराभूत होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका