मध्यवर्ती बाजारपेठ खोदकामांमुळे खड्डेमय

विविध कामांसाठी गावठाणसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असल्याने स्थानिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

वाहतुकीचा बट्ट्याबोळ; महापौरांचे आदेश धाब्यावर

नाशिक : शहरातील मुख्य बाजारपेठ आणि सभोवतालच्या परिसरात वेगवेगळ्या कारणांनी चाललेल्या खोदकामांमुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, सांगली बँक, महात्मा गांधी रोड यासह आसपासच्या लहान-मोठ्या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यातही तिथेच वाहने उभी केली जात असल्याने या भागात वाहतूक सुरळीत राखताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. खोदकामाचे संतप्त पडसाद महापालिकेच्या सभेत उमटल्यानंतर महापौरांनी खोदकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. तथापि त्यांचेही आदेश धाब्यावर बसविले गेले असून अनेक ठिकाणी आजही खोदकाम सुरू आहे.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

बराच काळ रखडलेल्या स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे मध्यवर्ती बाजारपेठेत जी स्थिती निर्माण झाली होती, त्याची पुनरावृत्ती स्मार्ट सिटी आणि महानगर गॅस कंपनीच्या वाहिनीसाठी झालेल्या खोदकामाने झाली आहे. त्याची किंमत मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिकांसह स्थानिक रहिवासी, वाहनधारक, पादचाऱ्यांना मोजावी लागत आहे. अशोक स्तंभ चौकात सोमवारी तीन वाहतूक पोलीस नियुक्त करूनही कोंडी सुटता सुटत नव्हती. तशीच स्थिती सांगली बँक चौकात आहे. या चौकातून मेनरोडकडे जाणारा रस्त्यावर अव्याहतपणे खोदकाम सुरू आहे. यशवंत व्यायामशाळेजवळ ‘पेव्हर ब्लॉक’ काढले. तिथे टाकलेल्या मुरूमाच्या ढिगाऱ्यांनी वाहतुकीला अडथळे येत आहेत. महात्मा गांधी रस्त्यावरील भ्रमणध्वनी बाजारपेठ वाहतूक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. एकाही दुकानात सुरक्षित अंतर, नियमांचे पालन होत नाही. गर्दीचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असताना पालिका प्रशासन निव्वळ बघ्याच्या भूमिकेत आहे.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

विविध कामांसाठी गावठाणसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असल्याने स्थानिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी नुकताच याबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. तेव्हा महापौर सतीश कुलकर्णी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरात सुरू असलेली खोदकामे थांबवावी, गॅस कंपनीने खोदलेले रस्ते पावसाचा जोर वाढण्याआधी दुरूस्त करण्याचे निर्देश दिले होते. काही भागात रस्त्यांची दुरुस्ती सुरू असली तरी मध्यवर्ती बाजारपेठ परिसरातील खोदकामे अद्याप थांबलेली नाहीत. ती अव्याहतपणे सुरू आहेत.