मध्य प्रदेशातून आणलेल्या सहा अल्पवयीन कामगारांची सुटका

सर्व मुले १६ ते १८ वयोगटातील आहेत व गेल्या दीड वर्षांपासून गुळाच्या कारखान्यात काम करीत आहेत.

श्रीगोंद्यातील गूळ कारखाना मालकावर गुन्हा दाखल

नगर : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून आणलेले व श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी परिसरात गुळाच्या कारखान्यात धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या ६ बालकामगारांची जिल्हा बालकामगार कृती दलाच्या गटाने ‘चाइल्ड लाइन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सुटका केली. आता या सहा मुलांची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे.

ही सर्व मुले १६ ते १८ वयोगटातील आहेत व गेल्या दीड वर्षांपासून गुळाच्या कारखान्यात काम करीत आहेत. ‘अनिश गूळ उद्योग‘ या कारखान्याचा मालक बापू ज्ञानदेव महारनोर (रा. डोंबरवाडी, वांगदरी, श्रीगोंदे) याच्याविरुद्ध बाल किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अंतर्गत कलम ३ अन्वये श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामगार अधिकारी तुषार गोपाळ बोरसे यांनी या संदर्भात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

या संदर्भात मिळालेली माहिती अशी, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील चाइल्ड लाइन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नगरमधील चाइल्ड लाइन्स संस्थेला या संदर्भात माहिती दिली होती. नगरमधील चाइल्ड लाइनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख व सहायक कामगार उपायुक्त यास्मिन शेख यांच्याशी संपर्क करून लेखी माहिती दिली. त्यानंतर जिल्हा बालकामगार कृती दलाची लगेच बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनिश गूळ उद्योगावर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. श्रीगोंदे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. तेथे एकूण ६ मुले आढळली.

ही मुले मध्य प्रदेशमधून आल्याची खात्री पटवण्यात आली. या मुलांना नगरमध्ये बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख यांच्यापुढे हजर करण्यात आले. समितीने मुलांची वैद्यकीय व करोना चाचणी करण्याचे आदेश दिले व सरकारी बालगृहात तात्पुरत्या स्वरूपात ठेवले. या मुलांकडे वयाची पडताळणी करण्याचे कोणतेच कागदपत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत त्यांच्या वयाचा दाखला घेण्यात आला. या वैद्यकीय तपासणीत ही मुले अल्पवयीन असल्याचे आढळले.

हे वाचले का?  Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

बालकल्याण समितीचे अध्यक्ष शेख, सदस्य अ‍ॅड. भाग्यश्री जरंडीकर व प्रवीण मुत्याल यांनी सहायक कामगार उपायुक्त शेख यांनी श्रीगोंदे पोलिसांना बाल किशोरवयीन कामगार अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्याचे सूचना केल्या. अधिक तपास हवालदार संतोष फलके करत आहेत. या कारवाईत चाइल्ड लाइनचे सदस्य शाहिद शेख, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, हवालदार गोकुळ पिंगळे, गृहरक्षक दलाचे जवान संतोष जगताप यांनी भाग घेतला.

चार वर्षांतील पहिलीच कारवाई

जिल्हा बालकामगारविरोधी कृती दलाच्या गटाने यापूर्वी ४ वर्षांपूर्वी नगर शहरातील कापड बाजारात कारवाई करून बालकामगारांची सुटका केली होती. त्यानंतर गेल्या चार वर्षांत अशी शोधमोहीम झाली नाही. ती थेट आता झाली. मध्य प्रदेशातील या मुलांचे काही नातेवाईक अनिश गूळ उद्योगात काम करतात. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीपूर्वी नातेवाइकांनी या लहान मुलांना कामासाठी आणले, असे चाइल्ड लाइनच्या चौकशीत निष्पन्न झाले.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

तक्रार करण्याचे आवाहन

जिल्ह्यत कोठे बालकामगार धोक्याच्या ठिकाणी काम करताना आढळले, तर त्वरित चाइल्ड लाइन संस्थेकडे, १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन नगर केंद्राचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.