मनमाडकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ, २० लिटर जारसाठी ४० रुपये दर

यंदा उन्हाळ्याच्या चारही महिन्यात मनमाडकरांना पाण्यासाठी रणरण भटकण्याची वेळ आली आहे.

लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि यंदाचा कडक उन्हाळा, यामुळे अखेरच्या टप्प्यात मनमाडकरांना तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदा उन्हाळ्याच्या चारही महिन्यात मनमाडकराना पाण्यासाठी रणरण भटकण्याची वेळ आली आहे. सध्या महिन्यातून एकदाच तर काही ठिकाणी २४ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने मनमाडकरांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

घरोघरी, उपाहारगृहे, हॉटेल, आदी व्यवसायाच्या ठिकाणी देखील २० लिटर जारसाठी ४० रुपये मोजावे लागतात. एक हजार लिटर टँकरसाठी ४०० रुपये द्यावे लागत आहेत घरगुती वापरासाठीही पाणी विकत घ्यावे लागत असल्याने मनमाडकर हैराण झाले आहेत. त्यातल्या त्यात दिलासा असा देण्यात येतो की, मनमाडसाठी पाण्याचे आवर्तन लवकरच मिळणार असून करंजवण धरणातून या आवर्तनासाठी पालखेड धरणामध्ये पाणी सोडले जात आहे. १२ ते १३ दिवसात मनमाडकरांना हे पाणी पाटोदा साठवणूक तलावामध्ये आवर्तनानुसार उपलब्ध होईल. त्यानंतर मनमाड शहराला पूर्वीप्रमाणे १७ दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

शहरात एक महिन्यापासून २४ दिवसात एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने भटकंती करण्याची वेळ आली आहे. ८५ टक्के कुपनलिका कोरड्या पडल्या. विहिरींमधील पाणीसाठाही संपुष्टात आला असून वाघदर्डी धरण गेल्या वर्षी भरले नाही. त्यामुळे मनमाडचा पाणीपुरवठा सध्या संपूर्णपणे पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे. लोकांनी पाण्याचा साठा करण्यासाठी टाक्या आणल्या खऱ्या, परंतु, उन्हाची तीव्रता इतकी वाढली की पाणी पुरत नाही. त्यामुळेच मनमाडकरांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. ४०० रुपयांमध्ये एक हजार लिटर पाणी मनमाडकरांना विकत घ्यावे लागत असून शहराच्या अनेक भागात दररोज पाण्याचे टँकर फिरताना दिसतात.

मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात जेमतेम १० ते १२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक असल्याने नगरपालिकेकडून महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो. गेल्या महिन्यात टंचाईमुळे नगरपालिकेचेही पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. १७ ते २० दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आता २३ ते २४ दिवसांआड होऊ लागल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शहराला १७ दिवसाआड पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

नगरपालिका प्रशासनाने याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवर्तनाची मागणी केली. नुकतेच करंजवण धरणातून पालखेड धरणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. रविवारपर्यंत पालखेड धरणातून मनमाड शहरासाठी पाण्याचे आवर्तन पालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावामध्ये दाखल होईल. त्यानंतर मनमाडकरांना १७ दिवसाआड पाणीपुरवठा होईल. सध्या धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आवर्तनाचे पाणी मिळाल्यानंतर पुन्हा मनमाडकरांना १७ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे काटेकोर नियोजन पालिकेतर्फे केले जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले आहे.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणातील पाण्याची पातळी वाढत्या तापमानाने मोठ्या प्रमाणावर खालावल्याने १७ दिवसात होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. मनमाडसाठी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन लवकरच मिळणार आहे. हे आवर्तन मिळाल्यानंतर मनमाडकरांना १७ दिवसात पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येईल -शेषराव चौधरी (मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपालिका)