मनसेचा शाखाध्यक्ष निवडीचा मुहूर्त निश्चित

राज हे आता थेट पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपला व्यक्तिगत भ्रमणध्वनी क्रमांकही संबंधितांना उपलब्ध केला आहे.

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात राहणार

नाशिक : शहरातील १२२ प्रभागात पक्षकार्यासाठी वेळ देऊ शकणाऱ्यांचा मुलाखतीद्वारे शोध घेतल्यानंतर मनसे आता नूतन शाखाध्यक्षांची नावे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबरला जाहीर करणार आहे. राज हे आता थेट पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी आपला व्यक्तिगत भ्रमणध्वनी क्रमांकही संबंधितांना उपलब्ध केला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज यांनी मुंबईत नाशिक जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच सहाही विभाग अध्यक्ष यांच्यासमवेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी आणि शाखा अध्यक्षांच्या नेमणुकीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी प्रथम सहाही विभाग अध्यक्षांबरोबर प्रथम वेगवेगळे आणि नंतर एकत्रितपणे भेट घेऊन पक्ष बांधणीबाबत सविस्तर चर्चा केली. राज यांनी सहाही विभाग अध्यक्षांना स्वत:चा व्यक्तिगत भ्रमणध्वनी क्रमांक देऊन यापुढे थेट संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत राज ठाकरे आणि मुंबईतील नेते मंडळी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

२२ तारखेला सर्व नूतन शाखा अध्यक्षांच्या नेमणुका होणार आहेत. २३ तारखेला सर्व सहाही विभागाचे विभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्षांचा एकत्रित मेळावा होणार आहे. बैठकीला युवा नेते अमित ठाकरे, वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते. नाशिकचे  मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह विभाग अध्यक्ष उपस्थित होते.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्यासह नेत्यांनी १२२ प्रभागात प्रत्येकी एक याप्रमाणे १२२ शाखाध्यक्ष नियुक्तीसाठी मुलाखती घेतल्या होत्या. जवळपास ८०० इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सांगण्यात आले होते. इच्छुकांचे शाखाध्यक्ष निवडीकडे लक्ष आहे.