“मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे” म्हणत तरूणाची आत्महत्या, राष्ट्रवादीचं सरकारवर टीकास्र; म्हणाले, “हेच का…”

“मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण हे मिळायलाच हवे”, अशी मागणीही राष्ट्रवादीनं केली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचं उपोषण सुरू आहे. जरांगे-पाटलांच्या उपोषणाला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. तसेच, सरकारही जरांगे-पाटलांच्या मागण्यांपुढं झुकत असल्याचं दिसत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे मराठा आरक्षणासाठी तरूणाने आत्महत्या केली आहे.

“‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असे म्हणत तरुणाची तलावात उडी टाकून आत्महत्या,” असं एक्स ( ट्वीटर ) अकाउंटवर राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे. तसेच, राष्ट्रवादीनं सरकारला प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

‘एक्स’ अकाउंटवर राष्ट्रवादीने म्हटलं, “धाराशिव जिल्ह्यातील माडज येथील किसन चंद्रकांत माने या तरुणाने, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशी घोषणा ठोकत गावातील तलावात उडी टाकून आत्महत्या केली. आता या घटनेला जवाबदार कोण? सरकार अजून मराठा समाजाची किती परीक्षा बघणार आहे?”

“शांततेच्या मार्गाने हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मोर्चा काढणाऱ्या सर्वसामान्य मराठा समाजावर लाठीचार्ज करतात. हेच आहे का सर्वसामान्यांच्या हक्काचे सरकार? अजून किती दिवस हा अन्याय सर्वसामान्यांवर लादला जाणार आहे? फक्त चर्चा करून तोडगा निघत नसतो त्यासाठी निर्णय देखील घ्यावा लागतो. आता काय अजून असे किती बळी जातील याची सरकार वाट बघत आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीनं सरकारला विचारला आहे.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

“सर्वसामान्यांचे बळी जातील, तेव्हा मराठा आरक्षण मिळणार आहे का? आता तरी सरकारला जाग यायला हवी आणि मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण हे मिळायलाच हवे,” अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे.