‘महवितरण’ला धनलाभ!

दुसरीकडे शहरातील ग्राहकांना हप्ते बांधून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार वीज ग्राहक संघटनेने केली आहे.

थकबाकीपोटी ११९ कोटी तिजोरीत जमा; शहरी ग्राहकांना हप्ते बांधून देण्यास टाळाटाळ

नाशिक : कृषिपंप वीजजोडणी धोरणांतर्गत परिमंडळात एकूण दोन हजार ८७३ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये या योजनेअंतर्गत नाशिक परिमंडळात एक लाख ५३ हजार ६२० शेतकऱ्यांनी कृषिपंप थकबाकीपोटी ११९ कोटी रुपयांचा भरणा करून लाभ घेतला आहे. करोनाकाळातील वीज देयकांच्या वादात वाढीव थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या महावितरणला काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील ग्राहकांना हप्ते बांधून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार वीज ग्राहक संघटनेने केली आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीज वाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजीकच्या रोहित्राची पुरेशी क्षमता असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबत ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीज वापर सुरु आहे, त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची पुरेशी क्षमता नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीज वाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या नाशिक मंडळामध्ये ५०५, मालेगाव मंडळामध्ये २५५ आणि अहमदनगर मंडळामध्ये १७७४ वीजजोडण्या अशा एकूण २५३४ जोडण्या नाशिक परिमंडळात देण्यात आल्या आहेत. या धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या योजनेचा शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. नवीन वीज जोडणी, थकबाकी सवलत आदींबाबतची माहिती स्वतंत्र बेव पोर्टलवर देण्यात आली आहे. नव्या जोडणीसाठी मराठीत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा महावितरणच्या संकेतस्थळावर या वेब पोर्टलची लिंक देण्यात आली आहे.

हे वाचले का?  सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

योजनेचा लाभ घेणारे शेतकरी

ऑक्टोबर २० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून नाशिक मंडलात १९ हजार २६३ शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी २२ कोटी  ३६ लाख, मालेगाव मंडलात २३ हजार ७५ शेतकऱ्यांनी २६ कोटी ३६ लाख आणि अहमदनगर मंडलात एक लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ७० कोटी सात लाख याप्रमाणे एकूण एक लाख ५३ हजार २६८ शेतकऱ्यांनी कृषिपंप  थकबाकीपोटी ११९ कोटी रुपयांचा भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

हे वाचले का?  Budget 2024 Tax Slab : टॅक्स स्लॅबमध्ये नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार? ओल्ड टॅक्स रिजिमवाल्यांनाही फायदा?

….तर घंटानाद आंदोलन

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी आणि मोठ्या देयकाचा भरणा सोयीचा व्हावा म्हणून परिपत्रक काढून क्षेत्रीय कार्यालयांनी ग्राहकास अटी, शर्तींसह हप्ते बांधून द्यावे, असे सूचित करूनही शहरात अनेक ग्राहकांना त्याचा लाभ देण्यास नकार दिला जात आहे. असे परिपत्रक अस्तित्वात नाही, तुमचे प्रकरण त्यात बसत नाही, अर्ज स्वीकारणार नाही, अशी कारणे देऊन ग्राहकांची बोळवण केली जाते. याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त होत असून मुख्य कार्यालयाचे परिपत्रक लपवून ग्राहकांना त्याचा फायदा पोहोचू न देणे बेकायदेशीर आहे. या संदर्भात महावितरणने त्वरित कार्यवाही न केल्यास वीज ग्राहक संघटना वीज कंपनीच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करेल, असा इशारा अ‍ॅड. सिद्धार्थ सोनी यांनी दिला.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल