महानगर बस सेवेच्या लोकार्पणातून प्रचाराचा बिगूल

गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे बस सेवेचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

भाजपकडून जय्यत तयारी

नाशिक : जवळपास दोन वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या आणि करोनासह अन्य कारणांनी रखडलेल्या नाशिक महानगर बस सेवेचे गुरूवारी पालकमंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. बस सेवेची मुहूर्तमेढ फडणवीस मुख्यमंत्री असताना रोवली गेली होती. महापालिका निवडणुकीपूर्वीच ही सेवा कार्यान्वित होत असल्याने तिचे राजकीय श्रेय घेण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले आहे.

गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे बस सेवेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी महापौर सतीश कुलकर्णी असतील.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

गेल्यावेळी महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा राज्यातही भाजपची सत्ता होती. महापालिकेने शहर बस सेवा ताब्यात घ्यावी की नाही, याविषयीचा संभ्रम नाशिकला दत्तक घेणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केला होता. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्या दिशेने पावले टाकावी लागली.

फडणवीस यांनी बससेवेला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तुकाराम मुंडे यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याची महापालिका आयुक्तपदी नेमणूक केली होती. महापालिकेची बससेवा शक्य तेवढ्या लवकर सुरू करण्यासाठी मुंडे यांनी नियोजन केले. नाशिक महानगर परिवहन महामंडळाची स्थापना झाली. तथापि, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि मुंडे यांचे काही जमले नाही. वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडाले. अखेरीस मुंडे यांची नाशिकमधून बदली केली गेली. पुढे राज्यात सत्तांतर झाले. राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी तोट्यातील बस सेवेला पूूर्वीच विरोध केला होता.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

महापालिका बस सेवेची तयारी करीत असताना करोनाचे संकट उद््भवले. त्यामुळे हा विषय मागे पडला. पहिल्या लाटेनंतर बस सेवा सुरू करण्याचे नियोजन झाले. तथापि, प्रादुर्भाव वाढल्याने तो निर्णयही लांबणीवर टाकावा लागला. दीड, दोन वर्षात एसटी महामंडळाने हळूहळू करीत शहर बस सेवा पूर्णपणे बंद केली.

नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महापालिका निवडणुकीस काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. पालिकेच्या बस सेवेचा जास्तीतजास्त राजकीय लाभ पदरात पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने बस सेवेच्या शुभारंभातून प्रचाराचा बिगूल फुंकण्यासाठी शक्य ते प्रयत्न के ले जाण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार