महापालिका शाळा १५ पासून सुरू होणार

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि महानगरपालिका शालेय प्रशासनाधिकारी यांचा समन्वय नसल्याने या गोंधळात दिवसागणिक भर पडत आहे.

प्राथमिक आणि माध्यमिकचा सुट्टय़ांचा गोंधळ कायम

नाशिक : शाळांच्या दिवाळी सुट्टीचा गोंधळ अद्यापही मिटण्याची चिन्हे नाहीत. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि महानगरपालिका शालेय प्रशासनाधिकारी यांचा समन्वय नसल्याने या गोंधळात दिवसागणिक भर पडत आहे. बुधवारी महापालिका प्रशासनाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशाने सुट्टीचा संभ्रम अधिकच वाढला आहे.

शहर तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करताना तारखा एकच राहाव्यात यासाठी मुख्याध्यापक संघ आग्रही होता. परंतु शाळा सुरू होण्याविषयी वेगवेगळय़ा तारखा जाहीर होत असल्याने गोंधळ अधिकच वाढत आहे. माध्यमिक विभागाने २२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील, असा आदेश जाहीर करत या गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांनी बुधवारी नवीनच आदेश दिल्याने गोंधळाचा पुढचा अंक पार पडला.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

या पत्रामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमधील असमन्वय प्रकर्षांने समोर आला आहे. महापालिका प्राथमिक विभागाच्या पत्रानुसार दिवाळीची सुट्टी १४ नोव्हेंबपर्यंत वाढविण्यात आली असून १५ नोव्हेंबर रोजी शाळा नियमितपणे सुरू होईल. ज्या प्राथमिक शाळांमध्ये १२ नोव्हेंबर रोजी ‘एनएएस’ चाचणी घेण्यात आली त्या शाळांना १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी विशेष सुट्टी असणार आहे. त्या शाळा १७ नोव्हेंबरपासून नियमित सुरू होतील. तसेच १९ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.

हे वाचले का?  Drishti IAS Institute : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर कारवाई, महापालिकेने लावलं सील; कारण काय?

प्राथमिक विभाग म्हणजे पहिली ते चौथी, मात्र शासकीय परिभाषेत पहिली ते सातवी, पहिली ते पाचवी तसेच पहिली ते चौथी शाळांनी मान्यता कुठल्या प्रकारात घेतली त्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार शाळा सुरू होण्याचा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनेक घरांमध्ये दोन पाल्य आहेत, त्यांच्या शाळा वेगवेगळय़ा तारखांना सुरू होणार आहेत. काही पालक दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी गेले आहेत. सध्या राज्य परिवहनचा संप सुरू असल्याने घरी कसे परतायचे हा प्रश्न आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा