महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

नवी दिल्ली : महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये होणाऱ्या या बहुस्तरीय, बहुपक्षीय निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक आजवर कधीही यंदाइतकी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या कप्पे-कंगोऱ्यांची झालेली नाही.

राज्यातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून जेमतेम तीन दिवस आधी निकाल लागणार आहेत. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्यासाठी केवळ तीन दिवस मिळू शकतील. महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक हरियाणातील निवडणुकीबरोबर ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. गेल्या वेळी २०१९ मध्ये राज्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान व २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. यावेळी मात्र जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक असल्यामुळे राज्यातील विधानसभेची निवडणूक एक महिना लांबणीवर टाकण्यात आली.

हे वाचले का?  NEET UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; ‘असा’ पाहता येणार निकाल!

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे भाजप, शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट अशा तीन पक्षांची महायुती एकत्र लढत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट व शिवसेना-उद्धव ठाकरे गट या तीन पक्षांची महाविकास आघाडी लढणार आहे. २८८ जागांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी १४५ जागांची गरज असून, यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

झारखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान

झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ व २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.

नांदेडमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक

राज्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेतली जात आहे. मतदान विधानसभेबरोबर २० नोव्हेंबर रोजी होईल. केरळमध्ये वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होत असून १३ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. दोन्ही मतदारसंघांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

हे वाचले का?  Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

रश्मी शुक्लाच पोलीस महासंचालक!

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची शक्यता केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फेटाळली. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून बाजूला करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शुक्ला यांची नियुक्ती कायदेशीर असल्याचे सांगत निवडणूक आयुक्तांनी यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

तुतारी’ हटवण्यास नकार!

● ‘तुतारी’ चिन्ह गोठवण्याची राष्ट्रवादी (शरद पवार)पक्षाची मागणी निवडणूक आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. आयोगाने ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत ‘तुतारी’ चिन्हही दिले गेल्याने मतदारांमध्ये गोंधळ झाला व त्याचा फटका पक्षाला बसला होता.

● सातारा मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य ‘तुतारी’ चिन्ह असलेल्या अपक्षाला पडलेल्या मतांपेक्षा कमी होते. त्यामुळे पक्षाच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती.

● मात्र ‘ंतुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह मतदानयंत्रांवर ठसठशीतपणे दिसेल इतके मोठे केले जाईल. त्यामुळे मतदारांना दोन्ही चिन्हांमधील फरक नेमकेपणाने समजू शकेल, असे आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

● ‘तुतारी’ चिन्हाचा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या चिन्हाला अडथळा येणार नाही, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

● निवडणुकीची अधिसूचना : २२ ऑक्टोबर

● उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : २९ ऑक्टोबर

● उमेदवारी अर्जांची छाननी : ३० ऑक्टोबर

● अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस :४ नोव्हेंबर

● मतदान : २० नोव्हेंबर

मतमोजणी : २३ नोव्हेंबर

एकूण जागा २८८