राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोपही यावेळी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर निशाणा साधलाय. कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिशीं बोलताना राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप करतानाच राज्याचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय.
“राज्यात कायदा सुव्यवस्था काही राहिलेली नाहीय. सगळ्या पोलीस प्रशासनाचा स्वत:च्या स्वार्थासाठी, स्वत:च्या इभ्रतीसाठी उपयोग करुन घेणं चाललं आहे. काल सुद्धा सांगलीमध्ये आहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेमधील नगरसेवकांच्या माध्यमातून पूर्ण झालं. त्याचं उद्घाटन सुद्धा पवारसाहेबांच्या हस्ते करणार, भाजपाच्या कोणालाही बोलवणार नाही. म्हणून काल आम्ही उद्घाटन करायचं ठरवलं. पाच हजार लोक रस्त्यावर होते. १४४ द्या, नोटीशी द्या सगळं सुरु होतं. जळगावमध्ये घडलेली घटना नवीन नाही. दडपशाही सुरु आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.h
तसेच, “एसटीच्या बाबतीत, वीज कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संपकऱ्यांनी संप करुन नये म्हणून दडपशाही सुरु आहे. हे सगळं चुकीचं आहे. लोकांना आपल्या मागण्या मांडण्याचा आणि त्या पूर्ण करुन घेण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. त्यांना अशाप्रकारच्या बंदी घालण्याची वेळ का येते याचा सरकारने विचार केला पाहिजे,” असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटलांनी राज्याचा कारभार राष्ट्रवादी चालवत असल्याचं सांगत शिवसेना आणि काँग्रेसला टोला लगावला. “महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदार, मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्यात. अधिकाऱ्यांचं म्हणणं खरं आहे त्यांच्याकडेच चावी आहे, बाकी कोणाकडे काही नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.