ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी नेमकं काय भाष्य केलं आहे वाचा सविस्तर बातमी
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करतील. पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचे वकील त्यांचा युक्तिवाद करतील. या सगळ्या गोष्टी वेळेत पार पडल्या तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागेल अशी शक्यता ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी वर्तवली आहे.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत सुरू करतील. पुढच्या आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद होईल. त्यानंतर कोर्ट ठरवेल तशी आखणी होईल. पुढच्या आठवड्यात त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद लवकर संपवला तर त्यानंतर निर्णय होईल. एवढ्या लवकर निर्णय होणार नाही असं वाटतं. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागेल असं वाटतं, असं अनिल देसाई यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात कुणाची सरशी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. तर त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांच्याविरोधात आम्हीच आधी अविश्वास प्रस्ताव आणला आहे असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अजूनही जैसे थे ठेवला आहे. आता सर्वोच्च सुनावणीत काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशात मार्च पहिल्या आठवड्यात निकाल लागू शकतो अशी शक्यता अनिल देसाई यांनी वर्तवली आहे.