महाराष्ट्रातील रुग्णांना फायदा होत असल्याचं समोर
संदीप आचार्य
मुंबई : करोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपी उपयुक्त असल्याचे आढळून येत नाही तसेच मृत्यूदर रोखण्यातही या उपचार पद्धतीचा उपयोग नसल्याचे दिसून आल्याने करोना उपचार मार्गदर्शक तत्वामधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याचे संकेत अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ( आयसीएमआर) दिले आहेत. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात करोनाच्या गंभीर रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल्स सुरुच राहातील, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने घेतली आहे. त्याचप्रमाणे करोनाची पहिल्या टप्प्यातील तसेच मॉडरेट रुग्णांना या उपचाराचा फायदा होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जगभरात प्लाझ्मा थेरपी च्या उपयुक्ततेवर वेगवेगळ्या प्रकारे संशोधन झाले असून करोनाच्या रुग्णांचा मृत्यू रोखण्यात याचा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. आयसीएमआरनेही भारतात याबाबत केलेल्या अभ्यासात प्लाझ्मा उपचार पद्धतीचा करोनाचा मृत्यूदर कमी करण्यात काहीही उपयोग नसल्याचे आढळून आले आहे. जगातील सर्वात मोठा अभ्यास आयसीएमआरने केला असून देशभरातील जवळपास ३९ रुग्णालयातून ४६४ गंभीर करोना रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये याबाबतचा पेपर प्रसिद्ध झाला असून करोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये या उपचार पद्धतीचा उपयोग होत नसल्याने ती राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वामधून रद्द करण्याचा आम्ही विचार करत असल्याचे आयसीएमआर चे अध्यक्ष बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ‘राष्ट्रीय कृती दला’च्या माध्यमातून घेतला जाईल असे बलराम भार्गव म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने राज्यात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरु केली असून करोना रुग्णांना होणाऱ्या उपयोगावरून तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. मात्र नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरु करण्यात आले असून आजघडीला १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच मुंबई महापालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरु झाली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा सेंटर सुरु करण्याची घोषणा केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी साडे सोळा कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणाही केली आहे. एवढेच नव्हे तर प्लाझ्मा दान चळवळ निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची प्लाझ्मा थेरपीबाबत काय भूमिका आहे असे राज्याच्या वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले “आयसीएमआरच्याच परवानगीने राज्यात पाच हजार गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी वापराचा अभ्यास सुरु झाला असून आम्ही तो थांबवणार नाही. महत्वाचे म्हणजे आयसीएमआरने अद्यापि याबाबत कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नसून केवळ मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाझा थेरपी उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे. तथापि राज्यात अनेक मॉडरेट रुग्णांमध्ये ही थेरपी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत संशोधन वा अभ्यास होण्याची गरज असून लवकरच आम्ही तो सुरु करू” असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपी ही १२० वर्ष जुनी असून आतापर्यंतच्या पँडँमिकमध्ये त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात आल्याचे सांगून राज्य टास्क फोर्सचे सदस्य व कॉलेज ऑफ फिजिशियन चे डिन डॉ शशांक जोशी म्हणाले, जगभरातील अभ्यासात करोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाझा थेरपी उपयुक्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाची लक्षणे असलेल्या नव्या रुग्णाला पहिल्या काही दिवसात प्लाझ्मा दिल्यास त्याचा उपयोग होते असे दिसून आले आहे. मात्र अँन्टिबॉडी लेव्हल म्हणजे प्रतिकारशक्ती नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मॉडरेट रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होतो याला शास्त्रीय आधार शोधण्याची गरज असून त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने त्याचा अभ्यास केला पाहिजे असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. तसेच करोनातून बरे झालेल्या रुग्णाने सहा ते आठ आठवड्यांपूर्वी प्लाझ्मा दान करू नये असेही डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे. रुग्ण निहाय प्लाझ्मा थेरपीचा निर्णय घेता येऊ शकतो तसेच करोना आढळून आल्याबरोबर पहिल्या टप्प्यात प्लाझ्मा दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असे राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.