आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी लॉकडाउन वाढवणार?
करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून १५ मे पर्यंत निर्बंध कायम आहेत. ठाकरे सरकारकडून आधी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान परिस्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याची शक्यता असून बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.
अस्लम शेख काय म्हणाले?
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना लॉकडाउनसंबंधी भाष्य केलं आहे. “आत्ताची जशी स्थिती आहे तसंच आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी विचार करण्यात येईल. लॉकडाउन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो, कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो, कोणते निर्बंध कडक करायचे याचा विचार करावा लागेल. आपण अभ्यास करत असून सर्वांची मतं घेत आहोत, त्यामुळेच यश मिळत आहे. टास्क फोर्स काय शिफारस करतं यासंबंधी कॅबिनेटमध्ये चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी लॉकडाउनचा फायदा झाल्याची माहिती दिली आहे. “लॉकडाउनमुळे मुंबई आणि महाराष्ट्राचा फायदा झाला आहे. लॉकडाउनआधी मुंबईची परिस्थिती, रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दुसरा लॉकडाउन करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपली तयारी सुरु होती. जम्बो सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे, कामं सुरु झाली आहेत. महाराष्ट्रात आता रेमडसेविरसाठी पहिल्यासारखी मारामारी नाही,” अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे.