देशात आज (३० ऑक्टोबर) एकूण ३ लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) होत आहे.
देशात आज (३० ऑक्टोबर) एकूण ३ लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक (By-Elections) होत आहे. या ३० विधानसभा जागांमध्ये १४ राज्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ५ जागा आसामच्या, ४ पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा हरियाणा, मिझोराम, नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीय. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान चालेल. याची मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.
देशातील ३ लोकसभेच्या जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. यात दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशमधील मंडी आणि मध्य प्रदेशमधील खंडवा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पक्षीय बलाबल
नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतर इथं आता पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.
नांदेड हा तसा पाहिला तर कॅबिनेट मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०१४ मध्ये शिवसेनेनं इथे काँग्रेस उमेदवाराला पराभूत करत अशोक चव्हाणांना मात देणं शक्य असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यामुळेच यंदा देखील काँग्रेसेतर पक्षांकडून या मतदारसंघासाठी जोरदार प्रयत्न केले जातील अशी चिन्ह आहेत. त्यात भाजपानं देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची करत काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी सरकारला मात देण्याची संधी म्हणून जोर लावला आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये भाजपाला खिंडार
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात भाजपाला खिंडार पडलंय. देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपातील दुफळी उघड झालीय. माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भास्कर पाटील खतगावकर यांच्यापाठोपाठ त्यांच्या सूनबाई मीनल खतगावकर यांनी देखील भाजपाला रामराम ठोकला आहे. जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. भास्कर पाटील खतगावकर हे अशोक चव्हाण यांच्या बहिणीचे पती आहेत. ७ वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. पण आता त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे.
दादरा नगरहवेलीमध्ये थेट शिवसेना-भाजपा लढत
दादरा नगर हवेली मतदारसंघाचे ७ वेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर मुंबईतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. डेलकर हे २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर निवडणूक रिंगणात उतरल्यात. त्या शिवसेनेच्या वतीने उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपाने आपला उमेदवार उतरवला आहे.
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येविषयी गूढ
मोहन डेलकर यांनी सुसाईड नोट लिहित मुंबईत आत्महत्या केली. त्यांनी या नोटमध्ये भाजपचे नेते आणि प्रफुल पटेल यांच्यासह अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली. या पथकाने आतापर्यंत एकूण १६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. शिवसेना आणि भाजपामध्ये थेट लढत आहे.