यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी सविस्तर भूमिका मांडेन, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना महाजन समितीने केलेल्या चुकांमुळे सीमाप्रश्न चिघळला असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या ३८व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
“सीमाप्रश्नासंदर्भात जी महाजन समिती नेमण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चुकांमुळे आज आपल्या त्रास होतो आहे. त्यांच्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे केंद्रशासनाने दोन्ही राज्याच्या प्रमुखांना बोलावून एक बैठक घ्यावी आणि त्यातून मार्ग काढावा”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, सीमाप्रश्नावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपसंदर्भात विचारलं असता, मला बाबतीत सध्या काही बोलायचं नसून मी २८ नोव्हेंबर रोजी सविस्तर भूमिका मांडेन, असेही ते म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. राज्यातील शिंदे सरकार कमकुवत असल्यानेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर दावा सांगितला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर राज्यातील एक इंच जमीनही कर्नाटकमध्ये जाणार नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.