केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का वाढावा यासाठी राज्य शासन आठ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करीत असले तरी अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही.
नाशिक – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का वाढावा यासाठी राज्य शासन आठ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करीत असले तरी अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मराठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह करण्यात येईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केली.
दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या भूमिपूजन सोहळय़ानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्ली येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे खासगी वर्ग आहेत. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनात वसतिगृह करण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारने तरतूद केल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण होऊन आकृतिबंध मंजूर झाला आहे, अशा महाविद्यालयांना ५० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणाला कौशल्यपूर्ण ज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना स्वबळावर आयुष्य जगण्यासाठी राज्य शासन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे. एखादे कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वाचे योगदान महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे हे उपकेंद्र उभारण्यासाठीदेखील लोकप्रतिनिधी आणि शासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारस असल्याने तो कधीही वाईट मार्गावर जाणार नाही, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.