राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड’, अशा शब्दांत रोहित पवारांनी शरद पवारांचं वर्णन केलं.
‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.
कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही ही शिकवण आजोबांकडून मिळाल्याचं रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. “अनेक लोकांना शरद पवार निवृत्त होतील असं वाटलं होतं. पण ते म्हणाले आपण हार मानायची नाही. कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग कोणीही तुमचा पराभव करु शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं”, असं ते म्हणाले.
पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. राजकीय जीवनात अनेक नेत्यांच्या वाट्याला येतात तसे चढउतार पवारांच्याही वाट्याला आले. मात्र कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही.