महिलांनी आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज; गौरव सोहळय़ात भाग्यश्री बाणाईत यांचे प्रतिपादन

भारतीय स्त्रीमध्ये स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात आपला लौकिक निर्माण करण्याची क्षमता असून, कुटुंबातील पिता आणि पती स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास ती कुठल्याही अडचणींवर मात करु शकते.

नाशिक : भारतीय स्त्रीमध्ये स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात आपला लौकिक निर्माण करण्याची क्षमता असून, कुटुंबातील पिता आणि पती स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास ती कुठल्याही अडचणींवर मात करु शकते. महिलांनी स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिर्डी संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत- धिवरे यांनी केले.

सटाणा येथील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे मित्रमंडळातर्फे सन्मान स्त्रीशक्तीचा-अभिमान कार्यकर्तृत्वाचाह्ण या संकल्पनेनुसार महिला गौरव सोहळा झाला. या सोहळय़ात बाणाईत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बाणाईत यांनी आकाशात फुगे सोडून केले. यावेळी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संयोजिका योगिता मोरे, दर्शना सोनवणे, सोनाली बैताडे, गायत्री खैरनार, सुनिता मोरकर, पूजा दंडगव्हाळ, तेहसीन शेख, सुनंदा  पवार, ललिता पाकळे ,कल्याणी पाटील यांच्यासह पुरस्कारार्थी महिला उपस्थित होत्या.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

अभिनेत्री माळी यांनी प्रत्येक कुटुंबातील महिला मेहनती, खंबीर आणि कर्तृत्ववान असते, त्यामुळे महिला कुटुंब सुस्थितीत सांभाळू शकतात. महिलांनी शरीर, आरोग्य, मानसिकता आणि बुद्धी तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे. या तिन्ही गोष्टी तंदुरुस्त असल्यास महिला खंबीरपणे प्रत्येक गोष्टीला यशस्वी तोंड देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांचा नुपूररंग शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम झाला. तसेच जादूगार अमित साळुंकी यांनी जादूचे प्रयोग सादर केले. गीतकार संजय गिते यांचा गीतयात्रा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात विलास शिरसाठ यांनी एकपात्री प्रयोग सादर केला.  सोहळय़ात सटाणा शहरातील महिला हजारोंच्या  संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सोडतीतील भाग्यवान महिलांना प्राजक्ता माळी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. 

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

यावेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, द्वारकाबाई पाटील, भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ, डांग सेवा मंडळ शिक्षण संस्थेच्या सचिव मृणाल जोशी, सटाणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक वर्षां जाधव, गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, वीरपत्नी कल्पना रौंदळ, ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या अंजुदीदी, अ‍ॅपेक्स रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सीमा खैरनार, ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका रेखा वाघ यांना सन्मानित करण्यात आले.  प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केले. आभार वैभव गांगुर्डे यांनी मानले.