महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता महिला राखीव जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
नाशिक : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता महिला राखीव जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या सोडतीवेळी इच्छुकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. शिवाय या संपूर्ण प्रक्रियेचे आभासी प्रणालीन्वये प्रक्षेपणही केले जाणार आहे. आरक्षणाचे प्रारूप एक जून रोजी प्रसिध्द केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी सहा जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत ४४ प्रभाग आणि १३३ जागा असतील. त्यात ४३ प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभाग चार सदस्यीय राहणार आहे. ओबीसी आरक्षण नसल्याने यंदा केवळ महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. एकूण जागांमधील निम्म्या म्हणजे ६७ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जातीच्या १९ जागा असून, त्यातील १० जागा महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जमातीच्या १० जागा असून, त्यातील पाच जागा महिलांसाठी असतील. उर्वरित खुल्या प्रभागात ५२ महिलांच्या जागा असतील. २३ प्रभागांमध्ये तीन पैकी दोन जागा महिलांसाठी असतील. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) अशा तीन संवर्गासाठी चिठ्ठी पध्दतीने आरक्षण काढले जाणार आहे. या आरक्षणावर निवडणुकीच्या रिंगणात कुटुंबातून कोण उतरणार, याची गणिते, समीकरणे अवलंबून आहेत. त्यामुळे या सोडतीकडे सर्वाचे लक्ष आहे. करोना काळात जवळपास दोन वर्ष दादासाहेब गायकवाड सभागृह बंद होते. सोडतीसाठी इच्छुकांसह समर्थकांची मोठी गर्दी होण्याची चिन्हे् आहेत. सभागृह परिसर, स्वच्छतागृह यांची स्वच्छता करण्यात आली. सोडतीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला पत्र देण्यात आले. महिला आरक्षणाची सोडत प्रक्रिया घरबसल्या पाहता येईल, याची व्यवस्था महापालिका करणार आहे. त्याकरिता या प्रक्रियेचे आभासी प्रणालीन्वये प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
एक जूनला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध
मंगळवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक जूनला आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द केले जाणार आहे. आरक्षणाबाबत हरकती व सूचना करण्यासाठी सहा जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.