भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या आणि आमदार के. कविता यांनी मंगळवारी ४७ पक्षांना पत्र लिहून संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या आणि आमदार के. कविता यांनी मंगळवारी ४७ पक्षांना पत्र लिहून संसदेच्या आगामी अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यासाठी एकत्रितरीत्या प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कविता यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह आंध्र प्रदेश, दिल्ली, बिहार, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे.
संसद आणि विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा केवळ अनन्य अधिकार नाही, तर अधिक न्याय्य व संतुलित राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचे साधन आहे, असा मुद्दा कविता यांनी मांडला आहे. देशभरातील विधानसभा आणि संसदेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अतिशय कमी आहे याकडे कविता यांनी या पत्रामधून लक्ष वेधले आहे.राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतूद असलेले महिला आरक्षण विधेयक हे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राजकीय मतैक्याअभावी ते अद्याप मंजूर झालेले नाही.
दरम्यान, कविता यांनी केलेल्या आवाहनाला राज्याचे भाजप अध्यक्ष किशन रेड्डी यांनी उत्तर दिले आहे. बीआरएसने तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवारी द्यावी आणि त्यानंतरच लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा उचलून धरावा, असा सल्ला रेड्डी यांनी दिला.