माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

माजी आमदार राजन तेली यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात “एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणाऱ्याला तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही”, असे म्हटले आहे. ते आज सायंकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “आरक्षण घेण्यासाठी आता एकच पर्याय”, मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “सत्तेत…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांना श्री तेली यांनी राजीनामा पाठविला आहे. या राजीनामा पत्रात म्हटले आहे, भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या राणे कुटूंबियांचा अंतर्गत होत असलेला त्रास तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक २०१९ ची विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षाअंतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदार संघात वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. परंतु, पुन्हा राणे कुटूंबिय भाजपा पक्षात दाखल होऊन आमचे खच्चीकरण करण्याचा तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहे. मी घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटूंबात जन्मलो. कष्टाने माझी राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही. याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो. हे मी समजू शकतो, असे या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला