माता-बहिणींचा आदर करण्यासाठी नंदीग्राम निवडले, ममता बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण

राज्यात भगव्या पक्षाला राजकीयदृष्ट्या “दफन” करण्याचे लोकांना केले आवाहन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी सावध पवित्र्यात दिसल्या. नुकत्याच झालेल्या एका भाजपा कार्यकर्त्याच्या ८५ वर्षांच्या आईच्या निधनानंतर आणि त्या घटनेच्या मागे टीएमसी चा हात असल्याच्या वृत्तामुळे आपली बाजू सावरत त्या म्हणाल्या की, त्यांनी येथील माता व बहिणींबद्दलच्या आदरामुळे नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले.

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या सुप्रीमोने भारतीय जनता पक्षावर हल्ला चढविला आणि राज्यात भगव्या पक्षाला राजकीयदृष्ट्या “दफन” करण्याचे लोकांना आवाहन केले. व्हीलचेयरवर काढलेल्या ‘पदयात्रे’ नंतर ममता बॅनर्जी यांनी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्रामच्या सोना चुरा भागात एका जनसभेला संबोधित केले.

हे वाचले का?  SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?

“मी इतर कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविली असती, परंतु या ठिकाणच्या माता-भगिनींचा आदर करण्यासाठी मी नंदीग्राम निवडले आहे. नंदीग्राम चळवळीला अभिवादन करण्यासाठी मी सिंगूर न निवडता नंदीग्राम निवडले,” असे नंदीग्राममधील मेळाव्यात बोलताना त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “लक्षात ठेवा मी एकदा नंदीग्राममध्ये प्रवेश केला तर मी पुन्हा नंदीग्राम सोडणार नाही. नंदीग्राम हे माझे स्थान आहे, मी येथेच राहीन.”

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातील माजी नेते आणि आता भाजपाचे नेते असलेल्या सुवेन्दु अधिकारी यांच्या विरोधात उभ्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात येत्या १ एप्रिलला या मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.