मार्चमध्ये नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात महोत्सव

करोनाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने ५ आणि ६ मार्च रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

पर्यटन संचालनालयाचा उपक्रम

नाशिक : करोनाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने ५ आणि ६ मार्च रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम होणार आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने विदेशी पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत असताना या महोत्सवाचे औचित्य काय, असा प्रश्न पक्षिप्रेमींकडून उपस्थित होत आहे.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने आयोजित नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य महोत्सवात पक्षी निरीक्षण, पक्ष्यांची ओळख, छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे उपक्रम होणार आहेत. ५ मार्च रोजी सकाळी बर्ड सायक्लोथॉन ही नाशिक ते नांदुरमध्यमेश्वर सायकल फेरी काढण्यात येणार आहे. याअंतर्गत वन्यजीव अभयारण्यातील स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची ओळख, जिल्ह्यातील वनवैभव आणि वन पर्यटन, अभयारण्यातील जैवविविधता याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय भित्तिचित्र प्रदर्शन होणार आहे.  महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ पक्षी निरीक्षक दत्ता उगांवकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक शेतकरी आणि आदिवासी यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन तसेच विक्रीही करण्यात येणार आहे. पोवाडा गायन, पथनाटय़ आदिवासी लोकनृत्यांचेही आयोजन आहे. सायक्लोथॉन आणि छायाचित्रण स्पर्धेसाठी ८४४६२९१६९५ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग

दरम्यान, अभयारण्यात गवताळ, पाणथळ पक्षी आहेत. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने विदेशी पक्ष्यांचे स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात स्थानिक पक्ष्यांसह काही मोजकेच विदेशी पक्षी या ठिकाणी दिसतील. या महोत्सवामुळे पक्ष्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, अशी भीती पक्षिमित्र चंद्रकांत दुसाने यांनी व्यक्त केली.