मालेगावात करोना रुग्णांची ससेहोलपट

‘आम्ही मालेगावकर’ समितीतर्फे आंदोलन

शहरात दिवसागणिक वाढणाऱ्या करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असल्याने याप्रश्नी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे मंगळवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

करोनावरील उपचारासाठी शहरातील सरकारी व विविध खासगी रुग्णालयांमध्ये स्थानिक तसेच आजुबाजूच्या सटाणा, नांदगाव, देवळा या तालुक्यातील रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे येथील जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा स्थितीत अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची उंबरठे झिजवण्याची वेळ येत आहे. सामान्य रुग्णालय तसेच महापालिकेने सुरू केलेल्या करोना रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना दाखल करणे तेथे अशक्य होत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत आहे. ज्यांची आर्थिक ऐपत नाही अशा रुग्ण व नातेवाईकांची त्यामुळे गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत. करोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नातेवाईकांना त्यासाठी धावपळ करावी लागत आहे. तसेच अनेकदा गरजेपोटी अव्वाच्या सव्वा दरात हे औषध घेण्याची वेळ येत असल्याची ओरड सुरु आहे. अत्यावश्यक स्थितीत वेळेवर प्राणवायू मिळू न शकल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्यादेखील तक्रारी आहेत.

करोना रुग्णांवरील उपचारासाठी होणारी परवड आणि या साथीच्या नियोजनातील एकूणच प्रशासकीय उणिवांकडे लक्ष वेधण्यासाठी समितीतर्फे निखिल पवार आणि देवा पाटील यांनी हे आंदोलन केले.  रेमडेसिविर औषधांच्या टंचाईसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे गेली दोन दिवस दूरध्वनीाद्वारे सातत्याने संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याची समितीची तक्रार आहे.

तसेच सरकारी रुग्णालयात करोना चाचणीचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात नाही. या अहवालास उशिर होत असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडत असल्याचाकडे समितीने लक्ष वेधले. शहरातील स्वातंत्र्य सेनानीपुत्र सुरेश भावसार यांचा ग्रामीण रुग्णालयात याच कारणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप समितीने केला आहे.