शुक्रवारी सायंकाळी तालुक्याच्या काटवन भागात विजांचा कडकडाट,गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
मालेगाव : शुक्रवारी सायंकाळी तालुक्याच्या काटवन भागात विजांचा कडकडाट,गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक घरांची पत्रे उडून गेली तसेच झाडे उन्मळून पडली. सततच्या अस्मानी संकटामुळे शेती पिकांना फटका बसत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
मालेगाव तालुक्यातील कजवाडे, रामपुरा, पोहाणे,विराणे,चिंचवे,गारेगाव,वडनेर,खाकुर्डी तसेच बागलाण तालुक्यातील चिराई,महड,बहिराणे,टेंभे आदी परिसरात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.एक ते दिड तास हा पाऊस बरसत होता.काही ठिकाणी गारपीटही झाली. तसेच बराच वेळ सोसाट्याच्या वारा सुरु होता. त्यामुळे काही घरांच्या छतावरील पत्रे उडून गेली. कांदा चाळी,पोल्ट्री व्यवसाय,हरितगृह व शेडनेट शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. काटवन भागात गेल्या महिन्याभरात दोन तीन वेळा अवकाळी पाऊस झाला आहे.या पावसामुळे काढणीला आलेले कांदा पीक व फळबागांचेही नुकसान झाले आहे.