आसाममधील आरोग्यमंत्र्यांचं विधान
महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसचा उद्रेक झालेला दिसतोय. सर्वत्र जनतेला मास्क घालण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, शनिवारी आसाममधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी मास्क घालण्याची आवश्यकता नाही, कारण आसाममध्ये आता करोना व्हायरस नाहीये असं विधान केलं.
शनिवारी ‘लल्लनटॉप’सोबत बोलताना हेमंत बिस्व सर्मा यांनी हे विधान केलं. जर आसाममधील परिस्थिती बदलली तर मास्क घालण्यााठी आदेश जारी करु असंही त्यांनी सांगितलं. “केंद्र सरकारने त्यांचे निर्देश द्यावेत पण आसाममधील सद्यपरिस्थिती बघता इथे करोना नाहीये. मास्क घालण्याची गरज असेल, तेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल”, असं सर्मा म्हणाले.
“विनाकारण लोकांना कशाला घाबरवयाचं…जेव्हा गरज असेल तेव्हा मी जनतेला मास्क घालण्याचं आवाहन करेन, की आजपासून मास्क घाला….पण आता आपल्याला अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. जर तुम्ही मास्क घातला तर पार्लर कसे चालतील? ब्युटी पार्लर देखील चालविणे आवश्यक आहे”, असं सर्मा म्हणाले. अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आसाम, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. या राज्यांत मंगळवारी मतदान होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मंगळवारी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. आसामचा हा शेवटचा मतदान टप्पा आहे.