जाणून घ्या रॅट मायनर्सच्या कुटुंबाने काय म्हटलं आहे?
उत्तरकाशीतल्या बोगद्यातून १७ दिवसांनी ४१ कामगारांची सुखरुप सुटका झाली आहे. या संपूर्ण बचाव मोहिमेत रॅट मायनर्सची भूमिका अत्यंत मोलाची होती. त्यांच्या कामाचं कौतुक होतं आहे. या रॅट मायनर्सना ट्रेंचलेस इंजिनिअरींग सर्व्हिसेस यांच्यातर्फे बोलवण्यात आलं होतं. दिल्लीत्या खजूरी या भागात काही रॅट मायनर्स राहतात. त्यांनी रॅट मायनर्सच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
दिवाळीच्या दिवशी अडकले मजूर
दिवाळीच्या दिवशी सकाळी म्हणजेच १२ नोव्हेंबरच्या दिवशी उत्तर काशीमध्ये भूस्खलन झाल्याने बोगद्यात काम करणारे ४१ मजूर त्या ठिकाणी अडकले होते. या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवसांची बचाव मोहीम राबवली गेली. या बचाव मोहिमेत एक वेळ अशी आली होती की सगळ्या मशीन्सनी काम करणं बंद केलं होतं. मात्र १२ रॅट मायनर्सच्या टीमने आपला जीव धोक्यात घालून या ४१ कामगारांचे प्राण वाचवले आहेत. याबाबत आता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
सहा रॅट मायनर्स दिल्लीतले
१२ पैकी सहा रॅट मायनर्स हे दिल्लीतल्या खजूरी या भागात राहतात. तर बाकीचे सहा हे उत्तर प्रदेशातले आहेत. आजतक या चॅनलने आरिफ मुन्ना या रॅट मायनरच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं आरीफ मुन्ना १२ दिवसांपूर्वी बोगद्यात अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची तीन मुलं घरी एकटी होती. या दरम्यान आरीफ मुन्ना यांच्या भावाने या तिघांचा सांभाळ केला. आरीफ मुन्ना यांच्या पत्नीचं करोना काळात निधन जालं. आरीफ यांच्या सहकाऱ्यांनीही सांगितलं की ते खूप चांगल्या स्वभावाचे आहेत आणि मदतीला धावून येतात. माझ्या वडिलांनी ४१ मजुरांचे प्राण वाचवले याचा मला मनस्वी आनंद आहे असं आरीफ मुन्ना यांच्या मुलाने सांगितलं.
नसीम यांचे कुटुंबीय काय म्हणाले?
रॅट मायनिंगचं काम करणारे हे मजूर पाइपलाइनसाठी काम करतात. दिल्लीतल्या पाणी विभागासाठी आणि गॅस विभागासाठी पाइपलाईन टाकण्याचं काम हे सगळे करतात. त्यामुळे जमिनीच्या आत भुयार कसं खणायचं? हे त्यांना अवगत आहे. नसीम यांच्या कुटुंबाने सांगितलं नसीम हे ज्या दिवशी बचाव मोहिमेचा भाग झाले तेव्हा त्यांच्या घरी दोन बहिणींचं लग्न होतं. मात्र ते बाजूला ठेवून ते बचाव मोहिमेत सहभागी झाले. आज त्यांच्या कुटुंबासाठी ते हिरो झाले आहेत.
नसीम यांचे कुटुंबीय म्हणाले की जे सहा लोक उत्तरकाशीला गेले होते ते अनेकदा एकत्रच काम करतात. कुठलंही संकट असलं तरीही मागे हटत नाहीत. आम्ही सगळे गरीब कुटुंबातले आहोत. आम्हाला कंपनीने बोलवलं. कुणाचे प्राण वाचणार असतील तर त्यापेक्षा मोठा आनंद कुठला? तोच मोठा आनंद मानून हे सगळे या मोहिमेत सहभागी झाले.
‘रॅट होल मायनिंग’ म्हणजे काय?
‘रॅट होल मायनिंग’ (उंदीर पोखरतो त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी हाताने उत्खनन) ही एक बेकायदेशीर कोळसा व अन्य खनिज उत्खननाची पद्धत आहे जी झारखंड आणि मेघालयात सामान्यपणे दिसून येते. या पद्धतीवर २०१४ मध्ये बंदी घालण्यात आली. ही एक प्राचीन पद्धत मानली जाते. यात कोळशापर्यंत पोहोचण्यासाठी पाच ते १०० चौरस मीटरपर्यंत खड्डा खोदणे समाविष्ट असते. खड्डा अरुंद असल्याने एका वेळी एकाच व्यक्तीला आत जाऊन कोळसा काढता येतो. कामगार दोरी किंवा बांबूची शिडी वापरून खाली उतरतात. बऱ्याचदा लहान मुलांचाही कामगार म्हणून वापर केला जातो. उंदीर ज्याप्रमाणे जमिनीत बीळ तयार करतात त्याच पद्धतीने बोगदा तयार केला जात असल्याने त्याला ‘रॅट होल’ म्हणतात.
मजुरांना बाहेर काढण्यासाठी ही पद्धत का वापरली?
उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक विदेशी उपकरणाचा वापर करण्यात आला. अमेरिकन ऑगर मशीनने बोगद्यात अंदाजे ४७-४८ मीटर छिद्र करण्यात आले होते. मात्र हे करताना उपकरणाचा काही भाग बोगद्यात तुटल्याने अडचणी आल्या. त्यानंतर बचाव कार्य पथकाने मानवी छिद्रण (ड्रिलिंग) पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. ही पद्धत ‘रॅट होल मायनिंग’ आहे.