‘मी पुन्हा येईनचे स्वप्न अजूनही जिवंत’; फडणवीसांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर

“हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला?”

परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेल्या या पत्रामुळे राज्यात खळबळच उडाली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा आक्रमक झाली. फडणवीसांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सरकारवर आरोप केले जात असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवारांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांसह भाजपा आणि परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल शंका उपस्थित केली आहे. “अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला, यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं,” असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.

“गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत, ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं,” असा टोलाही रोहित पवारांनी भाजपाला लगावला आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

“संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी. राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स. काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी, या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं. एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे,” असा प्रश्न रोहित पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल उपस्थित केला आहे.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

“हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या ‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’, या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो. अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा,” असा सल्लाही रोहित पवारांनी भाजपाला दिला आहे.

हे वाचले का?  रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्डच नाही

“काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा,” असं मत रोहित पवार यांनी मांडलं आहे.