मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता महामार्गावर वाकण फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक लोप्रतिनिधींनी विरोधात बोंबाबोंब करण्यात आली.
मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक प्रयत्न करूनही महामार्गाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे, प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे हाल होत आहेत. वडखळ ते इंदापूर या मार्गाची सध्या चाळण झालेली आहे. महामार्गाच्या या दुरावस्थेकडे कोकणातील लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख, मिलिंद आष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला व बालकलयाण मंत्री आदिती तटकरे यांना एसएमएस पाठविण्यात आले.