मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी; नितीन गडकरींची माहिती

सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तसंच समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर २५ ते ३० लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुंबईत विकासासाठी जागाच शिल्लक नाही

“महाराष्ट्र प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. त्यामुळे आपली ताकद आणि त्रुटी समजून घेण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांचा विचार करक मुंबईचा विकास केला पाहिजे. मुंबईला तिन्ही बाजूने समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योग-व्यावसायाचं महाराष्ट्रात विकेंद्रीकरण झालं तर राज्याचा विकास होईल. महाराष्ट्र सरकारने सल्लामसलत करुन पुढील २५ वर्षांचं व्हिजन डॉक्यूमेंट तयार केलं पाहिजे. अमलबजावणी केल तर महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसंच येत्या सहा महिन्यात फ्लेक्सी इंजिन आणणार, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारं इंजिन अशी माहिती त्यांनी दिली.

वरळी-वांद्रे सी लिंक दिल्ली-मुंबई हायवेला जोडणार

“मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक काम केली. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

“महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार असून संमती मिळाल्यास हा पूल बांधायला घेणार आहोत. त्यावर अभ्यास सुरु झाला आहे. हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती. हा पूल झाला नाही याचं शैल्य आहे, त्यामुळे हा पूल बांधायचं डोक्यात आहे,” असंही ते म्हणाले. “मुंबईत मेट्रोच्या वरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती. पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.