मुक्तसह दूरस्थ शिक्षण परंपरा अधिक सम़ृद्ध व्हावी;मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळय़ात राज्यपालांची अपेक्षा

मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थीच विद्यापीठाच्या कार्याचे प्रसारक आणि प्रचारक आहेत.

नाशिक: मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थीच विद्यापीठाच्या कार्याचे प्रसारक आणि प्रचारक आहेत. त्यातून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, देशविदेशापर्यंत विद्यापीठाचा नावलौकिक वाढत जावा, मुक्त आणि दूरस्थ शिक्षण परंपरा अधिकाधिक समृद्ध होत जावी, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात कोश्यारी यांनी आभासी प्रणालीन्वये मार्गदर्शन केले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कृषी वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त मायी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आ. सरोज आहेर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी शिक्षणापासून दूर असणाऱ्या समाज घटकांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य मुक्त विद्यापीठाने केले असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. मायी यांनी दूरस्थ शिक्षणात जास्तीतजास्त कुशल शिक्षकांची आवश्यकता असल्याचे सांगितले. भविष्यात दुरस्थ शिक्षण अधिक प्रभावी शिक्षण पद्धती ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाला मिळालेली नॅकची अ श्रेणी, कारोना काळानंतरची आव्हाने, आभासी शिक्षण प्रणाली, विविध नवीन शिक्षणक्रम, परीक्षा पद्धतीतील तंत्रज्ञान यासह विविध विषयांचा परामर्श घेतला.
मुक्त विद्यापीठाच्या २७ व्या पदवी प्रदान समारंभात सुमारे एक लाख, ३४ हजार विद्यार्थ्यांना पदवी, १४ हजार पदव्युत्तर पदवी, सुमारे २८ हजार पदविका, १५० पदव्युत्तर पदविका तर १३ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी देण्यात आली. प्रमुख पाहुणे उदय सामंत, डॉ. मायी, कुलगुरू डॉ. पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, विद्वत परिषदेचे सदस्य, नियोजन मंडळ सदस्यांचे मिरवणुकीव्दारे मुख्य व्यासपीठाजवळ आगमन झाले. परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील यांनी मानदंडसह या मिरवणुकीचे नेतृत्व केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्याशाखानिहाय विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या नावाने अध्यासन सुरू करावे
मंत्री उदय सामंत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपले हे विद्यापीठ केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता ते राज्याबाहेरही जायला हवे. देशाच्या सीमा ओलांडून ते आंतरराष्ट्रीय व्हायला हवे. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही सामंत यांनी दिली.
समाजातील विविध घटकांना पदवी
विद्यापीठाने समाजातील विविध घटकांना पदवी प्रदान करण्याची परंपरा कायम राखली. या पदवीदान सोहळय़ात अंध पदवीधर चार, लष्करातील जवान ६८, ज्येष्ठ नागरिक १९२, पोलीस कर्मचारी ७७, कारागृहातील बंदीजन १५ तर नक्षलग्रस्त भागातील नऊ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान